अमरावती जिल्ह्यातील धारणीत गर्भवती मातेचा प्रसूतीदरम्यान मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 08:16 PM2020-05-03T20:16:11+5:302020-05-03T20:16:37+5:30
येथील उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ नसल्याने अन्य रुग्णालयात हलविलेल्या गर्भवती महिलेचा प्रसूतूनंतर मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळच्या सुमारास उघड झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : येथील उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ नसल्याने अन्य रुग्णालयात हलविलेल्या गर्भवती महिलेचा प्रसूतूनंतर मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळच्या सुमारास उघड झाली.
अर्चना मंगेश कासदेकर, असे मृत गर्भवती मातेचे नाव आहे. माहितीनुसार, पाथरपूर गावातील ही महिला माहेरी भोकरबर्डी येथे बाळंतपणासाठी आली होती. शनिवारी प्रसववेदना झाल्यामुळे तिला स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात भरती केले. मात्र, रविवारी सकाळी ९ वाजता रुग्णालयातील परिचारिकेने डॉक्टर नसल्यामुळे व ठोके कमी झाल्यामुळे गर्भवती महिलेस अन्यत्र हलविण्याचा सल्ला नातेवाईकांना दिला. त्या आदिवासी महिलेला उतावली येथील सुशीला नायर हॉस्पिटल येथे नेण्यात आले. तेथे तिची प्रसूती झाली. तिने गोंडस मुलीला जन्म दिला आणि तिची प्राणज्योत मालवली. उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह तिच्या कुटुंबीयांकडे स्वाधीन करण्यात आला. दरम्यान एका महिलेच्या तक्रारीवरून उपजिल्हा रुग्णालयातील दोन स्त्रीरोग तज्ज्ञांविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्याने ते रजेवर गेलेत. अन्य एक तज्ज्ञदेखील रजेवर गेल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप होत आहे.
ती गर्भवती उपजिल्हा रुग्णालयात परवा आली होती. तिच्यावर स्त्रीरोगतज्ज्ञमार्फत उपचार करण्यात आले. तिची प्रकृती स्थिर होती. परंतु, शनिवारी सकाळी तिने स्वत:हून सुट्टी मागितली. त्यानंतर तिचे काय झाले सांगता येणार नाही. वैद्यकीय अधीक्षकांचा प्रभार चिखलदऱ्याच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे आहे. मी सध्या तात्पुरता कारभार पाहत आहे.
- धनंजय पाटील,
वैद्यकीय अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय, धारणी