मेळघाटातील गर्भवती, स्तनदा मातांसह कुपोषित बालकांचा आहार बंद; अडीच हजार अंगणवाडी केंद्रांना टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 06:34 PM2017-09-12T18:34:53+5:302017-09-12T18:34:53+5:30

विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी सोमवारपासून संप पुकारला आहे. परिणामी जिल्ह्यातील २५०० अंगणवाडी केंद्रातील ८० हजारांपेक्षा अधिक बालकांसह सहा हजारांवर गर्भवती आणि स्तनदा मातांना दिला जाणारा पोषणआहार पुरवठा बंद आहे.

Pregnant, pregnant mothers in Melghat stop feeding malnourished children; Avoid 2,500 Aanganwadi centers | मेळघाटातील गर्भवती, स्तनदा मातांसह कुपोषित बालकांचा आहार बंद; अडीच हजार अंगणवाडी केंद्रांना टाळे

मेळघाटातील गर्भवती, स्तनदा मातांसह कुपोषित बालकांचा आहार बंद; अडीच हजार अंगणवाडी केंद्रांना टाळे

googlenewsNext

परतवाडा, दि. 12 - विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी सोमवारपासून संप पुकारला आहे. परिणामी जिल्ह्यातील २५०० अंगणवाडी केंद्रातील ८० हजारांपेक्षा अधिक बालकांसह सहा हजारांवर गर्भवती आणि स्तनदा मातांना दिला जाणारा पोषणआहार पुरवठा बंद आहे. त्याचा फटका अतीसंवेदनशील मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्याला बसणार आहे. 
सोमवारपासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस संपावर गेल्याने जिल्ह्यातील १४ प्रकल्पांतर्गत येणाºया अडीच हजार अंगणवाडी केंद्रांना टाळे लागले आहेत. जिल्ह्यात ३ ते ६ वयोगटातील ८० हजारांवर लाभार्थी बालके आहेत. 

मेळघाटातील सर्व आहार बंद 
मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात ४८२ अंगणवाडी केंद्र असून ३५ हजार बालक आहेत. पैकी २ हजारावर बालके ३ ते ६ वयोगटातील  आहेत. त्यांना दररोज अंगणवाडी केंद्रातून मुगाची उसळ, तूर डाळ, तांदळाची खिचडी, अंडी दिली जाते. मेळघाटात कुपोषणाचे प्रमाण सर्वाधिक असल्याने शासनातर्फे आदिवासी बालकांची विशेष काळजी घेण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येतो. मात्र सोमवारपासून अंगणवाडी केंद्रांनाच टाळे असल्याने सर्व बालकांना देण्यात येणारा पूरक पोषण आहार बंद आहे. 

सहा हजार स्तनदा मातांचा आहार बंद 
गर्भवती आदिवासी महिलांना सुदृढ बालक जन्माला यावे, यासाठी तर जन्मणारे बालक कुपोषित होऊ नये, याकरिता स्तनदा मातांसाठी मेळघाटात ‘अमृत आहार योजना’ चालविण्यात येत आहे. मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यांत सहा हजारांवर गर्भवती आणि स्तनदा माता आहेत. त्यांना या योजनेंतर्गत वरण, भात, भाजी, पोळी, अंडी, शेंगदाणा लाडू आदी आहार दिला जातो. मात्र, सोमवारपासून हा आहारही  बंद पडला आहे. 

मुले आली अन् परत गेली 
मेळघाटातील अंगणवाडी केंद्रात आदिवासी मुले नेहमीप्रमाणे हातात ताट घेऊन आले. मात्र, अंगणवाडी केंद्राला कुलूप पाहून आल्या पावली परत गेली. अंगणवाडी सेविका व मदतनिसांचा संप लवकर न मिटल्यास मेळघाटातील कुपोषित बालकांच्या संख्येत झपाट्याने वाढ होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. 

शाळेतून दिली खिचडी
दररोज पोषण आहाराच्या आशेने अंगणवाडीत येण्याची सवय असल्याने नेहमीप्रमाणे चकरा मारणा-या चिखलदरा तालुक्यातील सोमवारखेडा यागावांतील दोन चिमुकल्यांना अखेर जिल्हा परिषदेच्या शाळेतून खिचडी देऊन त्यांचे समाधान करण्यात आले. 

अंगणवाडी सेविका व मदतनीस सोमवारपासून संपावर गेल्याने जिल्हाभरातील अंगणवाडी केंद्र बंद आहेत. संप लवकर मिटेल, अशी आशा आहे. 
- कैलास घोडके, 
उपमुख्यकार्यपालन अधिकारी 
म.बा.क. अमरावती

Web Title: Pregnant, pregnant mothers in Melghat stop feeding malnourished children; Avoid 2,500 Aanganwadi centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.