काकरमल येथील गर्भवती महिला विहिरीत कोसळली; बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थ व आरोग्य यंत्रणेचे रूग्णवाहिकासह धाव
By जितेंद्र दखने | Published: December 27, 2022 09:38 PM2022-12-27T21:38:35+5:302022-12-27T21:40:01+5:30
काकरमल येथील गर्भवती महिला ही विहिरीमधून बाहेर काढल्यानंतर रूग्णालयात सुरूवातीस येण्यास तयार नव्हती.
अमरावती : मेळघाटातील धारणी तालुक्यांतर्गत येत असलेल्या काकरमल येथील सुमित्रा कास्देकर ही २४ वर्षीय गर्भवती महिला पाणी काढण्यासाठी गावातील विहीर गेली असता तोल जाऊन कोसळल्याची घटना २७ डिसेंबर रोजी घडली. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ व आरोग्य यंत्रणेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रूग्णावाहिकेसह घटनास्थळ गाठले व गर्भवती महिलेला सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळविले.
सुमित्रा ही ७ महिन्याची गर्भवती असल्याने खबरदारीच्या दृष्टीने तिला उपचारासाठी रूग्णालयात नेण्यासाठी रूग्णवाहिका घेऊन गेलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना महिलेला बाहेर काढल्यानंतर संबंधित महिला रूग्णालयात उपचारासाठी तयार होत नव्हती. त्यामुळे तिला समजाविण्याचा बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर सुमित्रा उपचारासाठी रूग्णालयात येण्यास तयार झाली. त्यानंतर आरोग्य यंत्रणेने सुमित्राला धारणी येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. सुमित्राला कुठलीही गंभीर दुखापत झालेली नाही. मात्र गर्भवती असल्याने तिची प्रकृती खबरदारीसाठी तपासण्यासाठी रूग्णालयात दाखल केले असून सध्या तिची प्रकृती चांगली असल्याचे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी सांगितले.
काकरमल येथील गर्भवती महिला ही विहिरीमधून बाहेर काढल्यानंतर रूग्णालयात सुरूवातीस येण्यास तयार नव्हती. आरोग्य यंत्रणेतील कर्मचारी व ग्रामस्थांनी सुमित्राची समजूत काढल्यानंतर ती रूग्णालयात येण्यास तयार झाली. तिला धारणी येथील रूग्णालयात दाखल केले आहे. डॉक्टरांकडून तिची आरोग्य तपासणी केली जात आहे. तिच्या प्रकृतीवर आरोग्य विभागातील डॉक्टर लक्ष ठेवून आहेत.
डॉ. सुभाष ढाेले अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद