प्रारूप आराखड्याची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:16 AM2021-08-25T04:16:52+5:302021-08-25T04:16:52+5:30
अमरावती : जिल्ह्यातील मुदत संपलेल्या नगरपंचायती आणि नगर परिषदांमध्ये प्रारूप प्रभाग आराखडा तयार करण्याचे काम जिल्हा प्रशासनाने हाती घेतले ...
अमरावती : जिल्ह्यातील मुदत संपलेल्या नगरपंचायती आणि नगर परिषदांमध्ये प्रारूप प्रभाग आराखडा तयार करण्याचे काम जिल्हा प्रशासनाने हाती घेतले आहे. हे प्रारूप आराखडे तयार करताना ते घोषित करू नये, असे आदेश आयोगाचे आहेत. मात्र, यानिमित्ताने संबंधित ठिकाणी राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.
राज्यात डिसेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने अतिस्तत्वात आलेल्या नगरपंचायती व नगर परिषदांमध्ये एकल प्रभाग अंतर्गत निवडणूक घेण्याची तयारी निवडणूक आयोगाने केली आहे. निवडणुकीची तयार म्हणून पहिल्या टप्प्यात कच्चा प्रारूप आराखडा तयार करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. त्यानुसार प्रशासनाने जिल्ह्यातील मुदत संपलेल्या चार नगरपंचायती आणि नऊ नगर परिषदांवर लक्ष केंद्रित केले आहे. या सर्व ठिकाणीचे प्रारूप प्रभाग आराखडे कागदावर उतरविण्याची तयारी सुरू केली असून आवश्यक माहिती संकलित केली जात आहे. परंतु, आराखडे तयार झाल्यानंतर ते परवानगीशिवाय जाहीर करू नयेत, असे आयोगाने फर्मान सोडले आहे. त्यामागे वाद टाळणे हा आयोगाचा एकमेव उद्देश असला तरी इच्छुकांना धुमारे फुटले आहेत. कोरोना संकटामुळे पावणेदोन वर्षात कोणतीही मोठी निवडणूक झालेली नाहीत. अशातच आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे.
बॉक्स
निवडणूक होणार रंगतदार
गतवेळी युती सरकारच्या काळात थेट जनतेतून नगराध्यक्षांची निवड करण्यात आली. त्यामुळे बहुतेक नगर परिषदा व नगरपंचायतींमध्ये एकाच पक्षाचे अधिक सदस्य, मात्र नगराध्यक्ष दसऱ्या पक्षाचा अशी स्थिती निर्माण झाली होती. यंदा राज्यात तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार आहे. परिणामी नगर परिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकी रंगतदार होणार आहेत.
बॉक्स
येथे होणार प्रभाग रचना
जिल्ह्यातील धारणी, तिवसा, भातकुली आणि नांदगाव खंडेश्वर या चार नगरपंचायतींच्या मुदत संपल्या आहेत. आगामी डिसेंबर ते फेब्रुवारी या महिन्यादरम्यान अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, अचलपूर, चांदूर बाजार, मोर्शी, वरूड, शेंदूरजनाघाट, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे या नगर परिषदांची मुदत संपणार आहे. त्यामुळे येथील निवडणुकीची पूर्वतयारी आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने नव्याने प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.