जिल्ह्याचा एकात्मिक व्हिजन आराखडा तयार
By Admin | Published: April 2, 2015 12:33 AM2015-04-02T00:33:18+5:302015-04-02T00:33:18+5:30
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा प्रशासनाने अमरावती व्हिजन-२०२० आराखडा तयार करण्याचा संकल्प डिसेंबर, २०१४ मध्ये केला होता.
मिशन २०२० : जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
अमरावती : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा प्रशासनाने अमरावती व्हिजन-२०२० आराखडा तयार करण्याचा संकल्प डिसेंबर, २०१४ मध्ये केला होता. त्यानुसार सर्व विभागाकडून क्षेत्रनिहाय माहिती घेण्यात आली व प्रत्येक क्षेत्रामध्ये सध्या असलेल्या परिस्थितीवरुन पुढील ५ वर्षांचा लक्षांक, केंद्र व राज्य शासनाच्या धोरणानुसार योजनांची माहिती संकलीत करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी बुधवारी आयोजीत पत्रपरीषद दिली.
ते जिल्हा प्रशासनाने आयोजीत केलेल्या पत्रपरीषदेत मार्गदर्शन करतांना बोलत होते. पुढे बोलतांना गित्ते म्हणाले जिल्ह्याच्या भौतिक, आर्थिक व सामाजिक आव्हाने समोर ठेवून प्रत्येक विभागासाठी ५ वर्षांचा कालबध्द, लक्ष निर्धारीत कृती आराखडा आखण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने कृषी, जलसंपदा, पेयजल व स्वच्छता, शिक्षण, क्रीडा, आरोग्य, आदिवासी विकास, गृहनिर्माण, विद्युत, रस्ते, वाहतूक, रेल्वे, विमानसेवा, उद्योग, रेशीम उद्योग, पर्यटन व कला-सांस्कृती इत्यादी सर्व विभागाचे मुख्य उद्दिष्टे निर्धारित करुन संपूर्ण जिल्ह्याचा एकात्मिक आराखडा तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगीतले.
यासाठी जिल्हयाचे तत्कालीन पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली २ डिसेंबर २०१४ रोजी बैठक घेण्यात आली तसेच त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मागील ३ महिन्यांमध्ये विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत १० बैठका घेण्यात आल्या. जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या गाव मुक्काम कार्यक्रमातून देखील आवश्यक माहिती घेण्यात आली.
या आराखड्याचे प्रारुप सर्व नागरिकांकरिता अवलोकनार्थ जिल्हा प्रशासनाच्या संकेत स्थळावर १ एप्रिल ते ७ एप्रिल २०१५ या कालावधीत उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या अमरावती व्हिजन २०२० चा मुळ उद्देश जिल्ह्यातील २८ लक्ष नागरिकांना उच्च दर्जाच्या मुलभूत नागरी सुविधा पुरविणे, कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सिंचना सुविधा उपलब्ध करण्यासोबतच आरोग्य, शिक्षण, शहरी व ग्रामीण भागातील लोकांसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे इत्यादी आहेत.
या अमरावती व्हिजन-२०२० मधील योजनांची अंमलबजावणी गतीमान, पारदर्शी व प्रभावी पध्दतीने करुन जिल्ह्याच्या सध्याच्या मानव विकास निर्देशांकात ०.७१ वरुन ०.८१ पर्यंत वाढ होणे अपेक्षीत आहे. तसेच राज्यातील पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये अमरावती जिल्ह्याचे स्थान निश्चित होण्याचे ध्येय आहे. या व्हिजनमध्ये ठेवण्यात आले आहे. यासाठी सर्वाच्या सहकार्याची अपेक्षाही जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केली आहे.