अडसुळांची कुंडली तयार, सोमवारी सीपींना देणार पुरावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 10:26 PM2018-08-04T22:26:25+5:302018-08-04T22:29:27+5:30

कटकारस्थानांची मर्यादा ओलांडणाऱ्या खासदार आनंदराव अडसुळांची कुंडली आम्ही तयार केली असून, सोमवारी पुराव्यांसकट ती पोलीस आयुक्तांना देणार आहोत, असे जाहीर करून हिंमत असेल, तर जनतेच्या साक्षीने आमनेसामने येऊन चर्चा करा, असे खुले आव्हान आमदार रवी राणा यांनी अडसूळ यांंना शनिवारी पत्रपरिषदेत दिले.

Prepare the Horoscope Horoscope | अडसुळांची कुंडली तयार, सोमवारी सीपींना देणार पुरावे

अडसुळांची कुंडली तयार, सोमवारी सीपींना देणार पुरावे

googlenewsNext
ठळक मुद्देपत्रपरिषद : एकदा ‘दूध का दूध, पानी का पानी’ होऊच द्या, खासदारांना रवी राणांचे खुले आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कटकारस्थानांची मर्यादा ओलांडणाऱ्या खासदार आनंदराव अडसुळांची कुंडली आम्ही तयार केली असून, सोमवारी पुराव्यांसकट ती पोलीस आयुक्तांना देणार आहोत, असे जाहीर करून हिंमत असेल, तर जनतेच्या साक्षीने आमनेसामने येऊन चर्चा करा, असे खुले आव्हान आमदार रवी राणा यांनी अडसूळ यांंना शनिवारी पत्रपरिषदेत दिले.
राणा म्हणाले, नवनीत राणांविरोधात खासदार अनंदराव अडसुळांनी ४४८ पत्रे शासन, प्रशासनाला लिहिली. यापैकी ४० पत्रे जरी जिल्ह्याच्या विकासासाठी लिहिली असती तरी जिल्ह्याचा विकास झाला असता. मुंबईतल्या सिटी बँकेचे चेअरमन असणाऱ्या अडसुळांनी योग्यता नसणाऱ्यांना व निकटस्थांना २० टक्के कमिशन घेऊन कर्जवाटप केले. ९१ हजार खातेदारांचा विश्वासघात केला. सुनील जाधव यांना २० टक्के कमिशन घेऊन २० कोटींचे कर्ज वाटप केले. राजेंद्र सावंत यांना ५० लाखांच्या मॉर्गेेजवर ५ कोटींचे कर्ज दिले.
दबावाला घाबरणार नाही
मुंबईतल्या मराठी कामगारांनी भविष्यासाठी जमविलेल्या पुंजीची या चेअरमनने वाट लावली. निकटस्थांंना कर्जवाटप करून त्यांच्या नावे मालमत्ता खरेदी केली. हा घोटाळा मी उघड केला नाही. तो राष्ट्रीय स्तरावर यापूर्वीच उघड झाला. आमदार या नात्याने खातेदारांच्या माझ्याकडे तक्रारी आल्यात. त्याअनुषंगाने सामान्यांना न्याय मिळावा, यासाठी मी अडसुुळांनी केलेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध कायदेसंगत मार्गाने पत्रव्यवहार केला. त्याचा सामना करण्याऐवजी माझ्यावर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत अडसुळांनी गुन्हे नोंदवून घेतले. भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी लोकप्रतिनिधी या नात्याने पत्रव्यवहार करणे, सामान्यांना न्याय मिळावा, अशी मागणी करणे, हा अ‍ॅट्रॉसिटीचा मुद्दा कसा होऊ शकतो, असा सवाल करून या दबावतंत्राला मी मुळीच बळी पडणार नाही, असा इशारा राणा यांनी अडसूळांना दिला.
मातोश्रीवरही प्रतिष्ठा नाही
आम्ही प्रशासनाला 'मॅनेज' केले. निर्णय देणाऱ्या समित्यांना ‘मॅनेज’ केले, असे आरोप अडसूळ वारंवार करतात. त्यांच्यानुसार, मी आमदार असून हे सर्व करू शकत असेन, तर चार टर्म खासदार राहिलेले अडसूळ दिल्लीत करतात तरी काय? खासदारकीत इतकीही प्रतिष्ठा त्यांनी कमवू नये? जिल्ह्यातील जुन्या शिवसैनिकांचे मातोश्रीवर वजन आहे; मात्र अडसुळाचे नाही, असा टोलाही त्यांना हाणला.
खरे आहात तर, का रद्द झाले नाही नवनीतचे प्रमाणपत्र ?
जाती आयोगाने चार वेळा तपासणी करून आमच्या बाजूने निकाल दिला. उच्च न्यायालयाच्या द्विदल खंडपीठानेही नवनीत यांच्या बाजूने निकाल दिला. लोकसभा अध्यक्षांकडे तूम्ही केलेल्या तक्रारीनुसार महाराष्ट्राचे सचिव दिनेश वाघमारे यांनी पाठविलेल्या अहवालहीी आमच्या बाजुने दिला गेला. आम्ही खरे आहोत हाच याचा अर्थ. तुमचा तरीही आक्षेप कायम आहेच, तर सर्वोच्च न्यायालयात दाद मागा. षड्यंत्र कशापाई रचता, असा सवाल राणा यांनी अडसूळांना उद्देशून केला.
खासदारांनी काय दिवे लावले?
खासदारांची ही दुसरी टर्म आहे. जिल्ह्यात विकासाचे त्यांनी काय दिवे लावले, हे एकदा तरी जनतेला कळू द्या. नरखेड रेल्वे, रेल्वे वॅगन कारखाना, विमानतळ, चिखलदरा विकास, भारत डायनॅमिक्स कारखाना असे सारेच मुद्दे प्रलंबित आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आग्रहाखातर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अडसुळांसाठी सभा झाली. मोदी लाटेवर अडसुळ निवडून आले. आता अडसूळ त्याच मुख्यमंत्री आणि मोदींच्या विरोधात गरळ ओकतात. माझा राजीनामा मागणाऱ्या अडसुळांनी एकही आरोप सिद्ध करून दाखवावा, मी राजीनामा देईन. पण, सिद्ध न झाल्यास अडसूळ काय करणार, हेदेखील त्यांनी सांगावे, असे प्रतिआव्हान देतानाच अडसुळांनी यावेळीही अमरावतीतून निवडणूक लढवावीच. शिवसेनेने तिकीट न दिल्यास इतर पक्षाचे वा अपक्ष लढावे; पण लढावेच, अशी इच्छा राणा यांनी व्यक्त केली.
खासदाराने म्हणावे, सिटी बँक घोटाळ्याशी संबंध नाही!
सिटी बँक घोटाळ्यावर बोलल्यामुळे अडसूळ तळमळले. कटकारस्थाने करीत सुटले. त्यांनी समोर यावे आणि सिटी बँक घोटाळ्याशी संबंध नाही, असे जाहीरपणे सांगावे, असे आव्हान राणा यांनी अडसूळांना दिले. खासगी स्वीय सहायकाच्या माध्यमातून खासदारकीचे अधिकार वापरणाऱ्या अडसुळांनी विधानसभेच्या तिकिटाचे आमिष दाखवून माझ्याविरुद्ध बोलण्यासाठी योग्यता नसलेले कार्यकर्ते पोसले आहेत. माझ्याशी बरोबरी करण्याची कुठलीही लायकी नसलेले सुनील भालेराव, जयंत वंजारी आणि कार्तिक शहा यांना पुढे करून आरोप करण्याऐवजी खासदार या नात्याने निधड्या छातीने समोर येऊन अडसूळ स्वत: का बोलत नाहीत, असा सवाल राणा यांनी उपस्थित केला.
आमचा संबंध नाही खासदारांचा खुलासा
नवनीत राणा यांनी नोंदविलेल्या दोन भ्रमणध्वनी क्रमांकांशी खासदार आनंदराव अडसूळ, सुनील भालेराव, कार्तिक शहा यांचा संबंध नसल्याचे खासदारांनी पाठविलेल्या प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. राणा यांनी केलेले आरोप फेटाळत असून माहिती अधिकार कार्यकर्त्याशी १४३ वेळा बोलणाऱ्या व संघटीत गुन्हेगारी करणाºयांविरुद्ध न्यायालयात जाण्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
खूप झाली बाहेरच्यांची दादागिरी
आई अंबेचे, देवी रुक्मिणीचे पूजन करणाºया या अंबानगरीत खासदाराने महिलेच्या चारित्र्यावर बोलावे; हेच मुळी असंस्कृत. सातारा, मुंबईतून आलेली ही व्यक्ती येथील महिलेचा सर्रास अपमान करते. सुनील भालेराव, कार्तिक शहा हे बाहेरचे लोक अमरावतीची स्नुषा नवनीतची सोशल मीडियावरून बदनामी करतात. परस्त्रीचा अपमान झाला तरी खवळणारे आम्ही, घरातील स्त्रीचा वारंवार केला जाणारा अपमान कसा सहन करायचा? आता खूप झाली बाहेरच्यांची दादागिरी. आमच्या स्त्रियांची अब्रू मलीन करणाºयांनी यापुढे याद राखावे, असा खणखणीत इशारा राणा यांनी दिला.
धमकी, खंडणीचे १४३ कॉल रेकॉर्डिंग
अडसुळांनी कार्यकर्ते नव्हे, तर गुंड, ब्लॅकमेलर पोसले आहेत. तक्रारी करणे आणि त्या मागे घेण्यासाठी खंडणी मागणे हा त्यांचा व्यवसाय आहे. जयंत वंजारी, सुनील भालेराव, कार्तिक शहा यांच्या भ्रमणध्वनीवरील संभाषणाच्या १४३ रेकॉर्डिंग आमच्याकडे उपलब्ध आहेत. कॉल करणारे हे लोक शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत काय, असा सवाल आ. राणा यांनी केला. खंडणीचे, धमकीचे हे कॉल आहेत. सर्व ध्वनिफिती आणि ध्वनिचित्रफिती पोलीस आयुक्त संजय बाविस्कर यांना सोमवारी दुपारी दुपारी १२ वाजता नवनीत राणा सुपूर्द करतील. एकदा 'दूध का दूध, पानी का पानी' होऊनच जाऊ द्या, असे आ. राणा म्हणाले. पत्रपरिषदेत राणा यांनी एक चित्रफीत दाखविली. त्यात जयंत वंजारी हे राणा यांना भेटल्याचे आणि चर्चा करीत असल्याचे दिसते.

Web Title: Prepare the Horoscope Horoscope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.