अमरावती विद्यापीठाचा केंद्राकडे नव्याने डीपीआर, राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानाकडे सादर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2017 04:11 PM2017-11-22T16:11:04+5:302017-11-22T16:11:27+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने पुढील १० वर्षांचा गुणवत्तापूर्ण, शैक्षणिक आणि भौतिक विकासाने परिपूर्ण विकास आराखडा तयार केला आहे. १ हजार २१८ कोटी १३ लाख २२ हजार रुपयांची मागणी असलेला प्रस्ताव केंद्र सरकारच्या राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान (रूसा) कडे पाठविला आहे.
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने पुढील १० वर्षांचा गुणवत्तापूर्ण, शैक्षणिक आणि भौतिक विकासाने परिपूर्ण विकास आराखडा तयार केला आहे. १ हजार २१८ कोटी १३ लाख २२ हजार रुपयांची मागणी असलेला प्रस्ताव केंद्र सरकारच्या राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान (रूसा) कडे पाठविला आहे. अॅकेडमिक एक्सलन्स अॅन्ड प्लॅनिंग समितीने हा डीपीआर तयार केला, हे विशेष.
रूसाने राज्यातील सर्व विद्यापीठांना संस्था विकास योजनेंतर्गत डीपीआर मागविले होते. त्याअनुषंगाने कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समितीने हा डीपीआर अतिशय कमी अवधीत तयार करण्याची किमया केली आहे. पुढील १० वर्षांत विद्यापीठाला काय अपेक्षित आहे, याचा वेध घेऊन समितीने डीपीआर तयार केला असून, शैक्षणिक, भौतिक, वसतिगृहे, वाचनालये, संशोधनासाठी पायाभूत सुविधा, अत्याधुनिक साहित्य अशा सर्वंकष बाबीचा यात समावेश करण्यात आला आहे. नव्या डीपीआरमध्ये विद्यापीठाची शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागावी, यासाठी रूसा प्रयत्नशील आहे.
राष्ट्रीय अधिस्वीकृती व मूल्यांकन परिषदेने (नॅक) ठरवून दिलेल्या मापदंडानुसार विद्यापीठाने नवा डीपीआर तयार केला आहे. यात शैक्षणिक, मूल्यमापन, संशोधन, नवकल्पना, विस्तार, पायाभूत सुविधा, शैक्षणिक संसाधने, विद्यार्थी आधार, प्रगती, नेतृत्वगुण आणि व्यवस्थापन तसेच संस्थात्मक मूल्य विकासाचा समावेश आहे. नव्याने तयार केलेला डीपीआर रूसाकडे पाठविण्यात आला असून, या प्रस्तावाला मान्यता मिळताच विद्यापीठाचा झपाट्याने विकास करता येईल, असे संकेत आहेत.
या समितीने तयार केला डीपीआर
कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समितीने डीपीआर तयार केला आहे. यात प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, माजी कुलगुरू विलास सपकाळ, माजी प्र-कुलगुरू जयकिरण तिडके, ओमनवार, व्ही.एस. चौबे, राजेश सिंह, एस.एफ.आर. खादरी, मनीषा काळे व विद्यापीठ विकास विभागाचे उपकुलसचिव मंगेश वरखेडे यांचा समावेश आहे.
तीन टप्प्यांमध्ये विभागला प्रस्ताव
योजना संख्या आवश्यक निधी
लहान (शॉर्ट टर्म) ४४ १०३ कोटी ४४ लाख ३० हजार
मध्यम (मीडियम टर्म) १३१ ६०० कोटी ४६ लाख ६८ हजार
मोठे (लाँग टर्म) ५३ ५१४ कोटी २२ लाख २४ हजार
भविष्याचा वेध घेत नव्याने डीपीआर तयार केला आहे. शैक्षणिक, सामाजिक, भौतिक, सांस्कृतिक बाबीच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. विद्यार्थिकेंद्रित डीपीआर असल्याने रूसा या प्रस्तावाला नक्कीच मान्यता देईल. हा प्रस्ताव मान्य झाल्यास अमरावती विद्यापीठ जागतिक पातळी गाठेल, यात दुमत नाही.
- मुरलीधर चांदेकर
कुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ.