स्कॉटलँडमध्ये अमरावतीचा अनिरुद्ध विद्यार्थी संस्थेचा अध्यक्ष
By उज्वल भालेकर | Published: January 24, 2024 08:05 PM2024-01-24T20:05:54+5:302024-01-24T20:06:16+5:30
जातिभेद निर्मूलनाकरिता पहिल्या आंबेडकराइट विद्यार्थी संस्थेची स्थापना
अमरावती : जागतिक पातळीवर प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांपैकी एक असलेल्या स्कॉटलँड देशातील एडिनबर्ग विद्यापीठामध्ये पहिल्या आंबेडकरवादी विद्यार्थी संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. जागतिक पातळीवर वर्ण आणि वर्ग भेदासह जातिभेदसुद्धा तेवढाच गंभीर मुद्दा आहे. त्यामुळे विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून जात व त्याच्यासोबत निगडित पैलूंवर विद्यार्थ्यांना जागरूक करून जातिभेद निर्मूलनाकरिता त्यांना कृतिशील बनविण्याच्या मुख्य उद्देशातून या विद्यार्थी संस्थेची स्थापना करण्यात आली असून या संस्थेच्या अध्यक्षपदी अमरावतीचा मूळ रहिवासी असलेल्या अनिरुद्ध महाजन या विद्यार्थ्याची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
एका युरोपीय देशातील पहिली आंबेडकरवादी संस्था स्थापित करण्यामागे अनिरुद्ध महाजनचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे संपूर्ण अमरावती व विदर्भवासीयांसाठी व सोबतच समस्त बहुजनवादी समुदायासाठी ही आनंदाची व अभिमानाची बाब आहे. विशेषत: मागील वर्षीच अनिरुद्ध महाजन याला एडिनबर्ग विद्यापीठामध्ये पीएच.डी. करण्यासाठी ब्रिटिश सरकारने तब्बल दीड कोटी रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान केली होती.
‘आंबेडकराइट सोसायटी ऑफ एडिनबर्ग’ या संस्थेचा मुख्य उद्देश विद्यार्थी व नागरिकांना केवळ जातीसंदर्भात जागरूक आणि कृतिशील बनविण्यापर्यंत मर्यादित नसून त्याही पलीकडे जाऊन जातिभेद व वर्णभेद या दोनही जटिल समस्येविरुद्ध डॉ.बाबासाहेब आंबेडकर व डॉ. डू. बॉईस यांच्या प्रेरणेने सामूहिक लढा उभारण्याचा असल्याचे मत नवनिर्वाचित कार्यकारी समितीने व्यक्त केले. स्कॉटलँड देशाच्या इतिहासात जाती व वर्णभेदाविरुद्ध सामूहिक लढ्याच्या उद्देशाने स्थापित करण्यात आलेली ही पहिलीच संस्था असल्यामुळे ही अतिशय ऐतिहासिक घटना मानली जात आहे.