विद्यापीठात डिजिटायझेशन कामांच्या ‘अंडरटेकींग’साठी दबावतंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:12 AM2021-04-13T04:12:17+5:302021-04-13T04:12:17+5:30
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विविध विभागांत डिजिटायझेशनची कामे अपूर्ण असताना ती पूर्ण झालीत, असे ‘अंडरटेकींग’ लिहून देण्यासाठी ...
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विविध विभागांत डिजिटायझेशनची कामे अपूर्ण असताना ती पूर्ण झालीत, असे ‘अंडरटेकींग’ लिहून देण्यासाठी प्रमुखांवर दबाव आणला जात आहे. त्यामुळे भविष्यात ऑनलाईन कामकाजाचा फज्जा उडाल्यास विभागप्रमुख जबाबदार राहतील, अशी भीती आहे. तथापि, प्रमुख अधिकाऱ्यांकडून ‘डॉट कॉम इन्फोटेक’चे देयके देण्यासाठी कामे पूर्ण झाल्याचे लिहून घेण्यात येत असल्याची विश्वसनीय माहिती आहे.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या संपूर्ण विभागाचे डिजिटायझेशन करण्यासाठी सन २०१७ मध्ये ‘डॉटकॉम इन्फोटेक’ या कंपनीकडे जबाबदारी सोपविण्यात आली. मात्र, डिजिटायझेशनचे कामे अपूर्ण आणि देयकांप्रकरणी गठित चौकशी समितीचा अहवाल अप्राप्त असताना मार्च संपताच आता एका बड्या अधिकाऱ्यांने ‘डॉट कॉम इन्फोटेक’चे देयके अदा करून जीवलग मित्रत्व जोपासण्याचे शर्थीचे प्रयत्न चालविले आहे.
विद्यापीठात वित्त व लेखा, अंकेक्षण, परीक्षा विभाग, सामान्य प्रशासन, पीएच.डी. सेल, गोपनीय, नामांकन, आयक्यूएसी, ऑनलाईन पदवी, एनएसएस, रोस्टर मॅनेजमेंट, महाविद्यालयीन विभाग, अभियांत्रिकी विभाग अशा एकूणच विभागाचे कामकाज ऑनलाईन व्हावे, यासाठी डिजिटायझेशनची जबाबदारी ‘डॉट कॉम इन्फोटेक’कडे सोपविण्यात आली.
आतापर्यंत या कंपनीला कामापोटी २२ लाख रुपये देयके अदा करण्यात आले. मध्यंतरी देयके अदा केल्याप्रकरणी चौकशी समिती गठित झाली. अहवाल अप्राप्त आहे. मात्र, आता ‘डॉट कॉम इन्फोटेक’च्या संचालकाने ५० लाखांचे देयके मिळण्यासाठी प्रेशर वाढविले आहे.
------------
बॉक्स
विद्यापीठाचे बजेट ऑनलाईन का नाही?
विद्यापीठात ‘डॉट कॉम इन्फोटेक’ कंपनीने डिजिटायझेशन वेळेत आणि अचूक निर्माण केल्याचा काही अधिकारी दावा करीत आहेत. मात्र, बजेट मंजूर होऊन १५ दिवसांपेक्षा अधिक कालावधी झाला असताना आतापर्यंत एकाही विभागात ऑनलाईन मंजूर बजेट पाठविण्यात आले नाही. त्यामुळे खरेच सॉफ्टवेअर पूर्णपणे विकसित झाले का? असा सवाल उपस्थित होत आहे. तर दुसरीकडे ऑनलाईन बजेट मिळण्यासाठी काही विभागप्रमुख प्रतीक्षा करीत आहेत.
---------------------