आंघोळीचे फोटो काढल्याची बतावणी, ३ वर्षे शोषण केले; पाच वर्षांनंतर तक्रार
By प्रदीप भाकरे | Published: February 14, 2024 07:28 PM2024-02-14T19:28:59+5:302024-02-14T19:30:07+5:30
आरोपी पोलिस पाटील, वलगाव पोलिसांत बलात्कार व पॉक्सोचा गुन्हा
अमरावती : अंघोळ करतानाचे फोटो काढल्याची बतावणी करून त्याआड एका तरुणीचे तब्बल तीन वर्षे लैंगिक शोषण करण्यात आले. याप्रकरणी एका ३८ वर्षीय आरोपीविरोधात वलगाव पोलिसांनी १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास बलात्कार व पॉक्सो अन्वये गुन्हा दाखल केला. ज्यावेळी प्रथम गुन्हा घडला, त्यावेळी पीडिता ही १७ वर्षे १० महिने वयाची होती. तसे बयाण पीडिताने दिले आहे. प्रशांत ज्ञानेश्वर हरणे (३८, ता. भातकुली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
तक्रारीनुसार, २५ मार्च २०१६ रोजी पीडित अल्पवयीन मुलगी घरी एकटी असताना प्रशांत हरणे हा मागील बाजूने तिच्या घरात आला. त्यावेळी ती बाथरूममध्ये अंघोळ करीत होती. ती बाथरूमबाहेर येताच प्रशांत तिच्या पुढ्यात होता. मी तुझे अंघोळ करतानाचे फोटो काढले, असे तिला मोबाइल दाखवत तो म्हणाला. ते फोटो दाखवा, असे म्हटल्यावर आरोपीने आपल्याला आपल्याच घरात ओढले तथा जबरदस्तीने शारीरिक संबंध केल्याचे पीडिताने तक्रारीत म्हटले आहे. कुणाला काही सांगितल्यास, वाच्यता केल्यास मी तुलाच बदनाम करेन, मी पोलिस पाटील आहे, अशी धमकी त्याने दिल्याचे देखील तक्रारीत नमूद आहे.
सासू, पतीला सांगितली आपबीती
२५ मार्च २०१९ पर्यंत लग्न होईपर्यंत आरोपी प्रशांत हरणे याने पीडिताला धमक्या देऊन माहेरी असताना तिच्याशी शारीरिक बळजबरी केली. त्या प्रकाराने हतबल झालेल्या पीडिताने लग्न झाल्यानंतर दोनदा आत्महत्येचा प्रयत्नदेखील केला. त्यामुळे सासरी कुटुंबीयांनी तिला विश्वासात घेऊन विचारणा केली. पतीदेखील तिच्यामागे ठाम उभा राहिला. त्यामुळे पीडिताने १३ फेब्रुवारी रोजी पतीसह वलगाव पोलिस ठाणे गाठले. तेथे पोलिस उपनिरीक्षक भारती मामनकर यांनी पीडिताची तक्रार नोंदवून घेतली. पुढील तपास मामनकर करीत आहेत.