पहिलीशी फारकतची बतावणी करत त्याने केला ‘लिव्ह इन’मध्ये बलात्कार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2023 05:49 PM2023-05-10T17:49:53+5:302023-05-10T17:50:39+5:30
Amravati News पहिल्या पत्नीशी फारकत घेतली आहे, त्यामुळे तुझ्याशी लग्न करणारच, असे प्रलोभन देऊन ‘लिव्ह इन पार्टनर’ने आपले दशकभर शारीरिक शोषण केल्याची तक्रार एका ४४ वर्षीय महिलेने दर्यापूर पोलिसांत नोंदविली.
अमरावती : पहिल्या पत्नीशी फारकत घेतली आहे, त्यामुळे तुझ्याशी लग्न करणारच, असे प्रलोभन देऊन ‘लिव्ह इन पार्टनर’ने आपले दशकभर शारीरिक शोषण केल्याची तक्रार एका ४४ वर्षीय महिलेने दर्यापूर पोलिसांत नोंदविली. सन २०१२ ते मे २०२३ दरम्यान ती अत्याचाराची मालिका चालली. याप्रकरणी दर्यापूर पोलिसांनी ९ मे रोजी रात्री ९च्या सुमारास आरोपी प्रदीप नारायणराव गावंडे (रा. कळाशी) याच्याविरुद्ध बलात्कार व ॲट्रॉसिटी अन्वये गुन्हा दाखल केला.
आरोपीने आपल्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन लग्नाचे आमिष दिले तथा लग्न न करता काढता पाय घेतला, अशी तक्रार त्या महिलेने नोंदविली आहे. पोलीस तक्रारीनुसार, आरोपी प्रदीप गावंडे व पीडिता हे सोबत काम करीत होते. त्यावेळी आरोपीने दहा-अकरा वर्षांपूर्वी तिला प्रेमजाळ्यात ओढले. तू पसंत आहेस, असे म्हणून तिला लग्नाचे आमिषदेखील दिले. त्यामुळे तुम्हाला तर पत्नी आहे, तुम्ही माझ्याशी लग्न कसे कराल, असा प्रश्न महिलेला पडला. त्यावर त्याने आपण पत्नीला केव्हाच फारकत दिली आहे, अशी बतावणी करून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दरम्यानच्या काळात ते पती-पत्नीप्रमाणे लिव्ह इनमध्येदेखील राहिले. आरोपी वारंवार तिचे शारीरिक शोषण केले. मात्र आता नामानिराळा होण्याचा प्रयत्न करत तो गावातून पळून गेला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने दि. ९ मे रोजी पोलीस ठाणे गाठले. पोलीस सूत्रांनुसार, आरोपीची पहिली पत्नीदेखील घरी त्याच्यासोबतच राहते आणि पीडितादेखील तेथेच राहत होती, अशी माहिती समोर आली आहे.
४४ वर्षीय पीडिताच्या तक्रारीवरून ९ मे रोजी रात्री ६५ वर्षीय आरोपीविरुद्ध बलात्कार व ॲट्रॉसिटी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी पसार झाला असून, त्याचे मोबाइल लोकेशन सोलापूरला मिळाले आहे.
संतोष ताले, ठाणेदार, दर्यापूर