प्रशासकीय भवनाचे काम रोखले
By admin | Published: June 5, 2016 12:06 AM2016-06-05T00:06:49+5:302016-06-05T00:06:49+5:30
प्रशासकीय भवनासाठी सुरवाडी येथील शाळा अन्य ठिकाणी हलवून ३० लाखांच्या निधीत नव्याने शाळा बांधकाम करण्याचे ठरले.
सा.बां.चे दुर्लक्ष : शाळा बांधकामाचे ३० लाख अप्राप्त
तिवसा : प्रशासकीय भवनासाठी सुरवाडी येथील शाळा अन्य ठिकाणी हलवून ३० लाखांच्या निधीत नव्याने शाळा बांधकाम करण्याचे ठरले. प्रत्यक्षात प्रशासकीय भवनाचे काम पूर्णत्वास येऊनही शाळेला निधी न मिळाल्याने शुक्रवारी शाळा व्यवस्थापन समितीसह नागरिकांनी हे काम रोखले व निधीची मागणी केली.
सुरवाडी येथील शाळेचा अडसर असल्याने तीन वर्षांपूर्वी ही शाळा अन्यत्र बांधण्याचे ठरले व यासाठी मोझरी विकास आराखड्यातून ३० लाखांचा निधी देण्यात येणार होता. प्रशासकीय भवनाच्या बांधकामामुळे शाळेला तडे गेले आहेत. अद्याप ३० लाखांचा निधी शाळेला मिळाला नाही. शाळा शिकस्त असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे शनिवारी शाळा व्यवस्थापन समितीने प्रशासकीय भवनाचे उर्वरित बांधकाम रोखले व बांधकाम विभागाला शाळा बांधकामासाठी मंजूर ३० लाखाच्या निधीची मागणी केली. हा निधी १० दिवसाच्या आत न मिळाल्यास प्रशासकीय भवनासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला. यावेळी सरपंच प्रभाकर शेळके, उपसरपंच ताई मौजे, शाळा समितीच्या अध्यक्षा सुरेखा दाभाडे, मिलिंद राऊत, ज्योती मनवर, विद्याधर दंडाळे, चंद्रकांत निमकर, जगदीश देशमुख, हरिभाऊ खंगार, स्वाती ठाकरे, योगिता माहुरे, अर्चना खंगार यांची उपस्थिती होती.