लोकसहभागातून हवेच्या प्रदूषणाला अटकाव
By admin | Published: February 17, 2017 12:20 AM2017-02-17T00:20:43+5:302017-02-17T00:20:43+5:30
हवेच्या वाढत्या प्रदूषणाला अटकाव घालण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे.
महापालिकेचा पुढाकार : घनकचरा न जाळण्याचे आवाहन
अमरावती : हवेच्या वाढत्या प्रदूषणाला अटकाव घालण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. विविध विकासकामे करताना निर्माण होणारी धूळ, कचरा जाळणे, वाहनांमधून निघणाऱ्या धुरांमुळे हवेचे प्रदूषण होते. त्यापार्श्वभूमीवर महापालिकेने हवेच्या प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी
लोकसहभागाची साद घातली आहे.
महापालिकेचे एकूण क्षेत्रफळ १२१.६५ चौ. मीटर असून शहराची लोकसंख्या सुमारे ७ लाख आहे. शहराची विकासाकडे वाटचाल होत असताना पर्यावरणावर दुष्परिणाम होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक असल्याचे महापालिकेने म्हटले आहे. हवा प्रदूषणावर प्रतिबंध घालण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादानेही आदेश निर्गमित केले आहेत तथा विकासकामे व बांधकामापासून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट तसेच त्यामुळे होणारे हवेचे प्रदूषण नियंत्रणात आणण्याकरिता केंद्रीय व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिशानिर्देश दिले आहेत. त्याअनुषंगाने महापालिका क्षेत्रात घनकचरा जाळल्यास ५ ते २५ हजार रुपयांपर्यंत दंड आकारणी करून फौजदरी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश आहेत.
शहरातील प्रदूषणाचे प्रमाण
अमरावती : त्याअनुषंगाने हवा प्रदूषणाला अटकाव घालण्यासाठी लोकसहभागाचा संकल्प महापालिकेने सोडला आहे. दैनंदिन जीवनातीस काही सवयी बदलून प्रत्येक नागरिक हवा प्रदूषण नियंत्रित करण्यास सहकार्य करू शकतो, असे निरीक्षण महापालिका यंत्रणेने नोंदविले आहे. त्यासाठी नागरिकांचा सहभाग कसा असावा, याबाबत काही उपाययोजना महापालिकेने जाहीर केल्या आहेत. घनकचरा जाळू नये, याशिवाय बांधकाम करणे व पाडण्यासंदर्भातील नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना महापालिकेने दिल्या आहेत. नागरिकांनी हवा प्रदूषण टाळण्यासाठी छोट्या-छोट्या गोष्टी केल्यात आणि नियमावलीचे पालन केले तर हवेच्या प्रदूषणात वाढ होणार नाही. हवेच्या प्रदुषणाला अटकाव घालण्यासाठी जनतेने सजग होण्याची गरज असून यासंदर्भात अडचण असल्यास त्यांनी महापालिकेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
सल्फर, नायट्रोजनचे प्रमाण
शहरातील हवेच्या गुणवत्तेबाबत ‘अॅम्बीयंट एअर क्वालिटी मॉनिटरिंग’कडून उपलब्ध आकडेवारीनुसार रहिवासीक्षेत्रात उन्हाळ्यामध्ये नायट्रोजन आॅक्साईड, सल्फरडाय आॅक्साईडचे प्रमाण अनुक्रमे ११ ते १५ मायक्रोग्रॅम पर क्युबिक मीटर व ९ ते १४ मायक्रोग्रॅम पर क्युबिक मीटर आढळले. हे प्रमाण प्रदूषण पातळीपेक्षा कमी आहे.
औद्योगिक क्षेत्रात उन्हाळ्यामध्ये नायट्रोजन आॅक्साईड, सल्फरडाय आॅक्साईडचे प्रमाण अनुक्रमे ११ ते १६ व १० ते १५ मायक्रोग्रॅम पर क्युबिक मीटर इतके आढळले असून हेप्रमाण प्रदूषण पातळीपेक्षा कमी आहे. धुळीकणांचे प्रमाण ५७ ते ९७ मायक्रोग्रॅम पर क्युबिक मीटर म्हणजेच अनुज्ञेय पातळीपेक्षा अधिक आढळले.