सायबर गुन्हे टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 12:07 AM2018-01-24T00:07:52+5:302018-01-24T00:08:17+5:30
इंटरनेट क्रांती जनतेच्या फायद्याची असली तरी सायबर गुन्हे रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : इंटरनेट क्रांती जनतेच्या फायद्याची असली तरी सायबर गुन्हे रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे. सायबर गुन्हे टाळण्यासाठी केवळ प्रतिबंधात्मक एकच उपाय असल्यामुळे महाराष्ट्र शासनातर्फे राज्यभरात 'ट्रान्सफार्मिंग महाराष्ट्र' प्रकल्पांतर्गत जनजागृती केली जात आहे. मंगळवारी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी या प्रकल्पांतर्गत पोलीस आयुक्तालायत 'सायबर जाणीव जागृती कार्यक्रम' घेण्यात आला असून त्यामध्ये सायबर गुन्ह्यांविषयक माहिती देऊन त्यावरील उपाययोजनेसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
सायबर जाणीव जागृती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी सायबर गुन्ह्याविषयक माहिती देऊन जनजागृतीवर भर देण्याचे आवाहन प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना केले. यावेळी पोलीस उपायुक्त प्रदीप पवार, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, सायबर सेलचे सहायक पोलीस निरीक्षक कांचन पांडे, पीएसआय कान्होपात्रा बन्सा, पोलीस कर्मचारी संग्राम भोजने उपस्थित होते. पोलीस आयुक्त मंडलीक यांनी ट्रान्सफार्मिंग महाराष्ट्र प्रकल्पाच्या उद्देशावर प्रकाश टाकला, ते म्हणाले, आजच्या युगात इंटरनेट मानवाचा अविभाज्य घटकच बनला आहे.
इंटरनेटचा वापर करताना सावधगिरी बाळगली, तर सायबर गुन्हे टाळण्यास मोठी मदत मिळू शकते. सायबर गुन्हेगार नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हे करतात. त्यात सामान्य नागरिक बळी पडून आर्थिक व सामाजिक नुकसान होते. सायबर गुन्हे रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक झाली असून त्या अनुषंगाने शासनातर्फे राज्यभरात ट्रान्सफॉर्मींग महाराष्ट्र प्रकल्पांतर्गंत कार्यक्रम राबविले जात आहे. एपीआय कांचन पांडे यांनी सायबर गुन्ह्याविषयक माहिती देत त्यावरील उपाययोजना सुचवित प्रतिबंधात्मक उपाय सायबर गुन्हे रोखू शकते, असे मत व्यक्त केले. सायबर गुन्ह्यातील फिशींग, हॅकिंग, नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणे, विवाहविषयक फसवणूक, वैयक्तिक ओळख चोरी, बँकविषयक फसवणूक, एटीएमविषयक फसवणूक, विमा विषयक फसवणूक, समाजमाध्यमांद्वारे होणारे गुन्हे, आॅनलाईन खरेदीतील फसवणूक अशा आदी गुन्ह्यांवर पांडे यांनी प्रकाश टाकत त्यावर उपाय सुचविले. या गुन्ह्यांविषयक थोडीसी माहिती इंटरनेटचा वापर करणाºयास असल्यास हे गुन्हे टाळले जाऊ शकतात, असे मत कांचन पांडे यांनी प्रसार माध्यमांसमोर व्यक्त केले. तसेच सायबर गुन्हेगार कशाप्रकारे गुन्हे करतात. त्यानुसार इंटरनेट हाताळताना नागरिकांनी कशी काळजी घ्यावी, यावर उपाय त्यांनी सांगत प्रसार माध्यमांना जनजागृती करण्याचे आवाहन केले.