बैलजोडीला सोन्याचा भाव; बडनेराच्या बाजारात एक लाखाची जोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:36 AM2021-02-20T04:36:22+5:302021-02-20T04:36:22+5:30
श्यामकांत सहस्त्रभोजने बडनेरा : शेतात राबणाऱ्या गड्याचा वर्षाकाठी खर्च आवाक्याच्या बाहेर झाला आहे. जनावरांचा चारा प्रचंड महागला आहे, अशातच ...
श्यामकांत सहस्त्रभोजने
बडनेरा : शेतात राबणाऱ्या गड्याचा वर्षाकाठी खर्च आवाक्याच्या बाहेर झाला आहे. जनावरांचा चारा प्रचंड महागला आहे, अशातच बैलजोडीची किंमत लाखाच्या घरात पोहोचली आहे. बैलजोडीसाठी मनुष्यबळ, चाऱ्याची तरतूद अशा विवंचनेत शेतकरी सापडला आहे. याचा सारासार परिणाम गुरांच्या बाजारात रोडावलेल्या गर्दीवरून दिसून पडते आहे.
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत बडनेऱ्यात दर शुक्रवारी गुरांचा बाजार भरतो. जिल्ह्यात मोठा बाजार म्हणून त्याची ओळख आहे. येथील गुरांच्या बाजारात महाराष्ट्रासह इतरही राज्यांतून जनावरे विक्रीसाठी येत असतात कोरोना संसर्ग आधी बाजारात मोठी उलाढाल होत होती. संसर्गाचा मोठा परिणाम अलीकडे बाजारातील उलाढालीवर झाल्याचे चित्र आहे नुकत्याच झालेल्या शुक्रवारच्या बाजारात अमरावती जिल्ह्यातील सावरखेडा या ठिकाणच्या शेतकऱ्याच्या बैलजोडीला ९० हजारांची किंमत होती बैलजोडीला सोन्याचा भाव मिळत असला तरी त्याच्या मशागतीवर जोडी मालकाला मोठा खर्च करावा लागतो. बहुतांश बैलजोडी बाळगणाऱ्या शेतकऱ्याला शेतीतून कौटुंबिक गरजा पूर्ण कशा कराव्यात, अशी विवंचना असते. पूर्वी बैलजोड्यांच्या किमतीदेखील कमी होत्या. हिरवा चारा मुबलक होता. त्यामुळे शेतीकामासाठी बैलजोड्या वापरणे शेतकऱ्यांना परवडणारे होते. आता यांत्रिक शेतीकडे बराचसा कल आहे. एकूणच याचा सारासार परिणाम बैल बाजारांवर दिसून पडतो आहे.
बॉक्स : बाजारात ५० लाखांच्या घरात उलाढाल
या बाजारात एका दिवशी जनावरांच्या विक्रीमागे ५० लाखांच्या घरात उलाढाल होत असल्याची माहिती आहे. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश दिल्ली, पंजाब, हरियाणा, गुजरात, राजस्थान अशा विविध राज्यांतून जनावरे विक्रीसाठी येत असतात.
बॉक्स: बैलजोडीचा दिवसाचा खर्च
एका बैलजोडीला सांभाळण्यासाठी गड्याला कमीत कमी २०० रुपये रोज द्यावा लागतो तसेच बैलजोडीच्या चाऱ्यासाठी दिवसाला २०० रुपयांचा खर्च येत असल्याने एकूण बैलजोडीच्या खर्चावर शेतकऱ्याला ४०० रुपये मोजावे लागतात, अशी व्यथा अशोक अढाऊ नामक शेतकऱ्याने व्यक्त केली
बॉक्स: दुधाळ जनावरांची मागणी घटली
चाऱ्यासाठी लागणारा मोठा खर्च दुधाळ जनावरांच्या वाढत्या किमतीमुळे मागणीत घट होत असल्याचे बाजारात विक्रीसाठी व खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांमध्ये बोलल्या जात होते. म्हशीची किंमत ९० हजारांच्या घरात आहे तसेच जरशी होस्टेन गाईची किंमत चाळीस हजारांपर्यंत आहे.
प्रतिक्रिया
'' जनावरे सांभाळणे झाले कठीण
" जनावरांच्या सांभाळासाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे. शेतकऱ्यांकडे शेतीतील आवक कमी झाल्याने मजुरांना महागडा रोज देता येत नाही. मजुरांना इतर ठिकाणी चांगला रोजगार मिळतो. जनावरांचा सांभाळ कसा करावा? असा प्रश्न उद्भवला आहे.
प्रमोद भगवंतराव कोंडे, शेतकरी, मलकापूर
" तांत्रिक शेतीमुळे बैल जोड याकडे पाठ फिरवल्या जात आहे शेतकऱ्यांना बैलजोडी यांच्या साहाय्याने शेती करावी असे वाटत असले तरी मात्र बैलजोड्यांची मजुरी किंवा जोडी विकत घेण्याची आर्थिक ताकत नसल्याने सर्वच काही आवाक्याबाहेरचे झाले आहे.
श्रीराम पंजाबराव घोरमाडे, शेतकरी, नया अकोला
" चाऱ्याच्या किमती वाढल्यात. पूर्वी चाऱ्याची मुबलकता होती, हिरवा चारा मिळत असे जनावरांसाठी चारा आणण्यासाठी मोठा खर्च करावा लागतो यामुळेच शेतकऱ्यांना जनावरांचा सांभाळ करणे कठीण झाले आहे.
विलास पंजाबराव धांडे, शेतकरी, उत्तमसरा
कॅप्शन - सावरखेडा येथील शेतकरी नीलेश अशोकराव अढाऊ यांची बैलजोडी तिची किंमत ९० हजार रुपये ठेवण्यात आली. ( कॅप्शन)