साखरेपेक्षा गूळच खातोय भाव; घराघरांत वाढला वापर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:10 AM2021-06-26T04:10:19+5:302021-06-26T04:10:19+5:30
तब्बल तीस ते पस्तीस वर्षांपूर्वी ग्रामीण भागात गुळाचा वापर जास्त होत असे. तेव्हा साखरेच्या तुलनेत दरदेखील नगण्यच होता. त्यावेळेस ...
तब्बल तीस ते पस्तीस वर्षांपूर्वी ग्रामीण भागात गुळाचा वापर जास्त होत असे. तेव्हा साखरेच्या तुलनेत दरदेखील नगण्यच होता. त्यावेळेस गूळ वापरणारे गरीब, तर साखरेचा वापर करणारे श्रीमंत समजले जात होते. मात्र, कालांतराने गूळ शरीरासाठी कसा गुणकारी आहे, याची माहिती घरोघरी पोहोचायला सुरुवात झाली. त्यानंतर गुळाचा वापर बऱ्याच प्रमाणात वाढलेला दिसतो आहे. सध्या तर शहरांमध्ये लोक कॅन्टीनवर गुळाचा चहा प्रतिष्ठेचा ठरत आहे. गुळाचे नवनवीन पदार्थ तयार करण्याकडे घरातील गृहिणींचा कल असतो.
गुळाच्या तुलनेत अलीकडे साखरेचा वापर बराचसा कमी झाल्याचे पाहावयास मिळत आहे. गुळाचे उत्पादनदेखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ज्या भागात उसाचे उत्पादन अधिक आहे, तेथे गूळ तयार होतो. जगभरात सर्वांत जास्त गुळाची निर्मिती भारतात केली जाते. गुळातील गुणांमुळे बाजारात साखरेपेक्षा जास्त भाव असल्याचे चित्र आहे. गरिबांसाठी असलेला गूळ आता श्रीमंतीचे लक्षण समजला जात असून, अधिक भाव खातो आहे.
------------/////----------
बॉक्स :
गुळाचा चहा बनले स्टेटस
गुळाचे सेवन केल्याने अनेक फायदे होत असल्याने दैनंदिन आहारात त्याचा वापर वाढला आहे. अलीकडच्या पाच वर्षांत बहुतांश शहरी भागात चहा कॅन्टीनवर साखरेऐवजी गुळाचा चहा पिण्यावरच लोकांचा भर असतो. गुळाच्या चहाने आता स्टेटस मिळविले आहे.
-------------------------
प्रतिक्रिया-
आधी गूळ वापरणाऱ्यांना गरीब समजले जायचे. तेव्हाची ही कथित गरिबी आणि आताची श्रीमंतीदेखील आम्ही अनुभवली आहे. कालांतराने गूळ शरीरासाठी गुणकारी असल्याचे संशोधन झाल्याने आता त्याने घरोघरी आपली जागा केली आहे. आता तर गुळाचा भाव साखरेच्यादेखील पुढे गेला आहे.
- काशीनाथ बाबूराव ठवकर, बडनेरा
-------------------------
प्रतिक्रिया-
गुळामध्ये लोह असतो. त्याच्या सेवनाचे अनेक फायदे आहेत. रोगप्रतिकार शक्ती वाढते. रक्त शुद्ध होते. हाडे मजबूत होतात. जॉईंट पेन कमी करण्यास मदत होते. पचनशक्ती चांगली राहते. गुळाचा वापर नक्कीच प्रकृतीसाठी चांगला आहे.
- रसिका राजनेकर, आहारतज्ज्ञ, रिम्स हॉस्पिटल
अमरावती.
----------------------
प्रतिक्रिया-
गावखेड्यात साखरेचाच वापर अधिक असल्याचे दुकानातील विक्री वरून लक्षात येते. मात्र, गुळाचा गुळाचादेखील वापर आहे. पूर्वी ग्रामीण भागात गुळाचा वापर जास्त होता. गुळापेक्षा साखरेचे दरदेखील कमी आहे. परवडणाऱ्या वस्तूकडे ग्रामीण भागाचा कल असतो.
- श्रीकृष्ण सोनबावणे, दुकानदार, खल्लार बालाजी.
-------------------------
प्रतिक्रिया-
शहरात आधीच्या तुलनेत गुळाच्या खरेदीवर ग्राहकांचा कल वाढल्याचे दिसून पडते आहे. साखरेचादेखील खप वाढताच आहे. गुळाचे शरीराला अनेक फायदे होत असल्याने त्याचा हा परिणाम असावा. शहरात दोन्हींचा खप वाढताच आहे.
- सुभाष सिंघई, विक्रेते, बडनेरा.
-----------------------
प्रतिक्रिया -
गुळाचे अनेक फायदे अलीकडच्या काळात पुढे आल्याने ग्राहकांचा गुळाच्या खरेदीकडे कल वाढला आहे. शहरी भागात पूर्वी गुळाचा खप कमी होता, तो आता वाढला आहे. घरोघरी विविध पदार्थांमध्ये गुळाचा वापर केला जात आहे.
- कमलाकर महाजन, विक्रेते, लोणी टाकळी.
----------------------------
* असा वाढला गुळाचा भाव ( प्रति किलो)
वर्ष साखर। गूळ
1)२०००। १६ रुपये। १४ रुपये
2)२००१ । १६ रुपये। १६रुपये
3)२०१७ । ३५ रुपये। ४० रुपये
4)२०१८। ३३ रुपये। २५ रुपये
5)२०२० । ३६ रुपये। ४८ रुपये
6)२०२१। ३७ रुपये। ४८ रुपये
------------------–///---------////