डाळींचे भाव कडाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2016 12:30 AM2016-04-20T00:30:23+5:302016-04-20T00:30:23+5:30
तूरडाळीचे गतवर्षी भाव २०० रुपयांवर पोहोचले होते. त्यानंतर सरकारचे वेगवेगळे धोरण व यंदा अपुऱ्या पावसामुळे डाळवर्गीय पिकांच्या सरासरी उत्पन्नात ...
उडीद डाळीला सर्वाधिक भाव : तूर डाळही पोहोचली १५० रुपयांवर
अमरावती : तूरडाळीचे गतवर्षी भाव २०० रुपयांवर पोहोचले होते. त्यानंतर सरकारचे वेगवेगळे धोरण व यंदा अपुऱ्या पावसामुळे डाळवर्गीय पिकांच्या सरासरी उत्पन्नात कमी येऊन घटलेली आवक यामुळे पुन्हा बाजारात सर्वच प्रकारच्या डाळींचा तुटवडा निर्माण झाला आहे. मागील दोन आठवड्यांत डाळीमध्ये २० ते ४० रुपयांची दरवाढ झाली आहे. त्यामुळे डाळींची पुन्हा साठमारी होण्याची शक्यता असून सरकारने डाळीच्या दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गरज निर्माण झाली आहे.
मागील वर्षी आजवरची विक्री दरवाढ तुरीच्या डाळीत झाली होती. त्यामुळे सर्वसामान्यांच्या स्वयंपाक घरातून तूरडाळ हद्दपार झाली होती. यामध्ये सरकारही हवालदिल झाले होते. यावर उपाय म्हणून सरकारने पुरवठा विभागाद्वारा धाडसत्र राबविले व डाळींचे भाव काहीसे कमी झाले. यामध्ये चार महिन्यांचा दिलासा मिळत नाही. तोच पुन्हा डाळींच्या भावात वाढ होऊ लागली आहे.
मागील वर्षीच्या खरीप हंगामात पाऊस कमी, पावसात खंड व नैसर्गिक आपत्ती यामुळे डाळवर्गीय पिकांच्या उत्पादनात सरासरी ३० ते ३० टक्क्यांनी कमी आली. जमिनीत आर्द्रतेचा अभाव व शेंग पोखरणारी अळी व मळणीच्या हंगामात अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे कडधान्याचे उत्पादन घटले. शेतकरी आर्थिक अडचणीत असल्याने त्याने मिळेल त्या भावात तुरीची विक्री केली. त्यामुळे शेतकऱ्यांजवळ भाववाढ होत असताना माल विक्रीसाठी नाही याचा फायदा साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांनाच होत आहे. सरकारचे नियंत्रण नसल्यामुळे यांच्यात काही दिवसांत डाळीची मोठ्या प्रमाणात भाववाढ होण्याची शक्यता व्यापारी सूत्रांनी वर्तविली आहे. (प्रतिनिधी)
दोन आठवड्यात भाववाढ
सध्या वर्षभऱ्याचे धान्य व डाळ खरेदीचा हंगाम व लग्नसराई आहे. त्यात दाळीची आवक घटल्याने डाळीचे भाव कडाडत आहे. १५ ते २० दिवसात पुन्हा डाळीमध्ये तेजी येण्याची शक्यता असल्याचे व्यापारी सुत्रांनी सांगितले. दोन आठवड्यापूर्वी १२० रुपये असणारी तुरदाळ आता १५० रुपयांवर आली आहे. तर उडिद दाळीची स्थिती सर्वात गंभीर आहे. १३० ते १४० रुपये असणारी उडिद दाळ १८० रुपये मूगदाळ ८५ ते ९५ रुपयांवर १०० रुपये, हरभरा दाळ ५५ त ६० रुपयांवरुन ७५ ते ८० रुपये झालेली आहे. ज्या दाळीला मागणी नाही त्या मसुर दाळीमध्ये १५ ते २० रुपयांची वाढ होऊन ती ५५ ते ६० रुपयांवरुन ७० ते ७५ रुपयांवर पोहोचली आहे.
तुकडा तुरदाळीची मागणी वाढली
तुरदाळीची मागणी वाढत असल्याने अनेक जन तुकडा तुरदाळीला प्राधान्य देत आहे व त्यालाही चांगली मागणी आहे. सद्यस्थितीत ही तुकडा तूरदाळ ११० ते १२० रुपये किलोप्रमाणे विकल्या जात आहे.