शार्दुलचे मॉडेल देशपातळीवर पोहोचल्याचा अभिमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 10:17 PM2018-04-13T22:17:24+5:302018-04-13T22:17:24+5:30
वाहतूक घनतेचा प्रश्न सोडविणारे शार्दुलचे मॉडेल रस्त्यावरील प्रदूषण व वाहनाचे इंधन या दोन्ही बाबींपासून होणारा त्रास वाचविणारे आहे. राज्य विज्ञान प्रदर्शनातून त्याचे मॉडेल देशपातळीवर पोहोचल्याचा अभिमान असल्याचे मत शिक्षणाधिकारी (माध्यमिक) नीलिमा टाके यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : वाहतूक घनतेचा प्रश्न सोडविणारे शार्दुलचे मॉडेल रस्त्यावरील प्रदूषण व वाहनाचे इंधन या दोन्ही बाबींपासून होणारा त्रास वाचविणारे आहे. राज्य विज्ञान प्रदर्शनातून त्याचे मॉडेल देशपातळीवर पोहोचल्याचा अभिमान असल्याचे मत शिक्षणाधिकारी (माध्यमिक) नीलिमा टाके यांनी व्यक्त केले.
धामणगाव रेल्वे येथील से.फ.ला. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता सातवीतील शार्दुल मोहन राऊत या विद्यार्थ्याने शिक्षक राम बावस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली आॅटोमॅटिक ट्राफीक कंट्रोल हे रस्त्यावरील वाहतूक घनतेवर उपाय सांगणारे मॉडेल तयार केले. चाळीसगाव येथील राज्य विज्ञान प्रदर्शनात त्याच्या मॉडेलने अव्वल क्रमांक घेतला. त्यामुळे शिक्षण विभागाच्या इतिहासात पहिल्यांदाच शिक्षणाधिकाऱ्यांनी पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्याच्या घरी जाऊन पालक, शिक्षक व त्याचा सत्कार केला़ देशात वाहतुकीचे महत्त्व सर्वाधिक आहे. आगामी काळात ट्राफीक सिग्नलवर वाहतुक सुरळीत व्हावी, देशाच्या अर्थकारणाला त्याचा लाभ व्हावा म्हणून शार्दुल राऊत याने तयार केलेले मॉडेल देशात अव्वल ठरेल, असा विश्वास टाके यांनी व्यक्त केला़ शार्दुल राऊतचे पालक मोहन राऊत, मीनाक्षी राऊत यांचा त्यांनी सत्कार केला़ यावेळी विज्ञान पाठ्यपुस्तक निर्मिती व राज्य निर्धारक शाळा सिद्धीचे सदस्य गजानन मानकर, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण समन्वयक व्यावसायिक विकास संस्थेचे समन्वयक श्रीनाथ वानखडे, राम बावस्कर, अनूप अग्रवाल यांची उपस्थिती होती़ शिक्षक राम बावस्कर यांचाही सत्कार करण्यात आला़ सेफलाचे प्राचार्य गणेश चांडक, उपप्राचार्य मनोज हांडे, गोपाल मुंधडा, मनोहर, अजय जिरापुरे यांचीही उपस्थिती होती़