साद्राबाडीत भूकंप नसल्याचा प्राथमिक अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 09:52 PM2018-08-24T21:52:51+5:302018-08-24T21:53:14+5:30
साद्राबाडी व परिसरातील भूकंपसदृश घटनांबाबत भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या (जीएसआय) पथकाने केलेल्या पाहणीमध्ये भूकंप नसल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला. तथापि, अधिक तपासासाठी या परिसरात तीन भूस्तर हालचालमापक यंत्रणा कार्यान्वित करण्यात येतील, असे या विभागाचे संचालक मिलिंद धकाते यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : साद्राबाडी व परिसरातील भूकंपसदृश घटनांबाबत भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या (जीएसआय) पथकाने केलेल्या पाहणीमध्ये भूकंप नसल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला. तथापि, अधिक तपासासाठी या परिसरात तीन भूस्तर हालचालमापक यंत्रणा कार्यान्वित करण्यात येतील, असे या विभागाचे संचालक मिलिंद धकाते यांनी सांगितले.
नागपूर व जबलपूर येथील भूगर्भ निरीक्षण केंद्रात या घटनेची नोंद झालेली नाही. या घटनेत जमीन हलून आवाज येण्याचा प्रकार घडत आहे. साधारणत: जमिनीच्या पोकळीत पाणी भरले गेले की हवा बाहेर येऊन आवाज येण्याच्या घटना घडू शकतात. साद्राबाडी येथे पावसाळ्यात साधारणत: आॅगस्टमध्येच यापूवीर्ही याप्रकारचे आवाज येण्याच्या घटना घडल्या असल्याचे धकाते यांनी सांगितले. भूगर्भातील छोट्या हालचालीचीही नोंद घेऊ शकेल, अशा तीन अतिसंवेदनशील क्षमतेच्या तीन यंत्रणा सोमवारी साद्राबाडी येथे बसविण्यात येतील, जेणेकरून अधिक ठाम निष्कर्षापर्यंत पोहोचता येईल, असे ते म्हणाले. शुक्रवारी उशीरा याबाबतचा खुलासा झाला. यापूर्वी तिवसा तालुक्यातील शेंदूरजना बु. येथेही अशाच प्रकारे जमिनीतून आवाज येण्याचा प्रकार घडला होता.
भूगर्भात पाणी मुरल्याने हादरे
भूस्तरीय रचनेनुसार हा प्रदेश डेक्कन ट्रॅपमध्ये येतो. डेक्कन ट्रॅपमध्ये जमिनीच्या अंतर्गत थरात पोकळ्या असतात. पावसाचे पाणी शिरून त्यातील हवा बाहेर येऊन आवाज येऊ शकतो व काही हालचालही संभवते. त्याचप्रमाणे, या थरांत चुनखडीचा दगडही असतो. तो पाण्याने भिजला की, त्यातील हवा बाहेर फेकली जाऊन आवाज येऊ शकतो. त्यामुळे ही घटना भूकंप नसल्याचा प्राथमिक अंदाज असला तरी आम्ही आणखी संशोधन करत आहोत. त्यासाठी आवश्यक बाबींचे नमुने घेतल्याचे धकाते म्हणाले.