प्राथमिक आरोग्य केंद्र वाऱ्यावर

By admin | Published: January 10, 2015 10:47 PM2015-01-10T22:47:28+5:302015-01-10T22:47:28+5:30

मोर्शी तालुक्यातील विचोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या महिला वैद्यकीय अधिकारी स्नेहलता गाडबैल यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून त्यांच्या विरोधात नागरिकांनी तक्रारी दिल्या आहेत.

Primary health center at the wind | प्राथमिक आरोग्य केंद्र वाऱ्यावर

प्राथमिक आरोग्य केंद्र वाऱ्यावर

Next

श्रीकृष्ण मालपे - नेरपिंगळाई
मोर्शी तालुक्यातील विचोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या महिला वैद्यकीय अधिकारी स्नेहलता गाडबैल यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून त्यांच्या विरोधात नागरिकांनी तक्रारी दिल्या आहेत. यावरून जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता वरील उणिवा आढळून आल्याने जि.प. सीईओंनी त्यांना शोकॉज नोटीस जारी केली आहे. आठ दिवसांत खुलासा पाठविण्याचे त्यात नमूद आहे. त्यांच्या महिला प्रतिबंधक गुन्ह्याखाली तक्रार दाखल करण्याच्या भीतीने वरिष्ठ अधिकारीही त्यांना घाबरत असल्याची चर्चा आहे.
वैद्यकीय अधिकारी गाडबैल या पाच-सहा वर्षांपासून येथे कार्यरत आहेत. परंतु त्या मुख्यालयी राहत नसून दुपारी १२ वा. येणे तसेच ३-४ वाजता निघून जाणे हाच त्यांचा नित्यक्रम आहे. रुग्णांची व्यवस्था नर्स किंवा कम्पाऊंडरला पहावी लागते. त्यामुळे रुग्णांची परवड होते. कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया शिबिर आटोपताच या वैद्यकीय अधिकारी निघून जातात. शस्त्रक्रियेनंतर रुग्णांची देखभाल होणे गरजेचे असताना येथे वैद्यकीय अधिकारी हजर राहत नाही. यावरून वैद्यकीय अधिकाऱ्याला रुग्णांच्या जीवाशी काहीही देणे-घेणे नाही, असे दिसून येते. गंभीर अवस्थेत रुग्णाला येथे दाखल केले जाते. परंतु वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याने येथे अनेक अडचणी निर्माण होतात. त्याचप्रमाणे या वैद्यकीय अधिकारी आपल्या कर्मचाऱ्यांना निलंबनाची धमकी देऊन त्यांच्यावर दबाव आणतात. तसेच आरोग्य केंद्रातील कामाच्या बिलाचे संबंधितांकडून कमिशन मागतात, असा नागरिकांचा आरोप आहे.
आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेत राहत नाही. मात्र रुग्णवाहिकेचा डिझेलचा खर्च एक लाखाचे वर दाखविला जातो. याची चौकशी होणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. रुग्ण कल्याण समितीच्या हिशेबाची खोटी बिले दाखवल्याचे व केरोसीन खरेदी न करता पाच हजार रुपयांचे बिल लावण्याची ऐकिवात आहे.
अशा भ्रष्टाचारी वैद्यकीय अधिकाऱ्याविरुद्ध रुग्ण कल्याण समितीने मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रारी केल्या असून चौकशीही झाली. मात्र कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात कुणी तक्रार करण्यात पुढे आल्यास छेडखानी केल्याच्या नावाखाली महिला प्रतिबंधक गुन्ह्यात गोवण्याची धमकी दिली जाते. त्याअनुषंगाने येथील माजी सरपंचाला तरुंगाची हवा खावी लागली. त्यामुळेच जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिकारी येथे सायंकाळी ५ वा. नंतर किंवा वारंवार भेटी देण्याचे टाळतात. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या तक्रारीविषयीची कल्पना असल्याने तेसुध्दा येथे भेट देण्यास टाळतात.
वैद्यकीय अधिकारी स्नेहलता गाडबैल या कुणालाही जुमानत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यांच्या या बेलगाम वागण्याला आळा घालून त्यांची येथून त्वरित हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी विचोरीवासीयांनी केली आहे. ६ जानेवारी रोजी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी पथकासह विचोरी प्रा.आरोग्य केंद्राला भेट दिली असता येथील कॅशबुक अपूर्ण आढळून आले. तर वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याचे निदर्शनास आले. त्यावरून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांनी वैद्यकीय अधिकारी स्नेहलता गाडबैल यांना शोकॉज नोटीस बजावली आहे. त्यांना वरील कारणांचा खुलास करण्याचे नोटिसीत नमूद केले आहे. (वार्ताहर)

Web Title: Primary health center at the wind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.