१ मार्चपासून प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 10:13 PM2019-02-24T22:13:47+5:302019-02-24T22:14:02+5:30
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात नियमानुसार सुरू करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. ग्रामीण भागाची वस्तुस्थिती बघता प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याचे हे संकेत मानले जात आहे. दुसरीकडे शिक्षणाधिकाऱ्यांनी पावले उचलल्याची माहिती मिळाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात नियमानुसार सुरू करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. ग्रामीण भागाची वस्तुस्थिती बघता प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याचे हे संकेत मानले जात आहे. दुसरीकडे शिक्षणाधिकाऱ्यांनी पावले उचलल्याची माहिती मिळाली आहे.
प्राथमिक शिक्षक संघटनेने सकाळच्या सत्रात शाळा सुरू करावी, या आशयाच्या मागणीचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले. या पत्रात ग्रामीण भागाची वस्तुस्थिती विशद करण्यात आली आहे. १५ फेब्रुवारीपासून उन्हाळ्याची चाहूल लागली असून, मार्च महिन्यात उन्हाची तीव्रता वाढपण्याची चिन्हे आहेत. त्या पार्श्वभूमिवर शहरी भागातील शाळांमध्ये असलेल्या सोईसुविधा ग्रामीण भागातील शाळांमध्ये उपलब्ध नाहीत. त्यामुळे प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना असह्य वेदना झेलत उन्हाळ्यात शिक्षण घ्यावे लागते. अशातच ग्रामीण भागात दुष्काळ, पाणीटंचाई आणि शाळांमध्ये पंखे, हवेशिर वर्गखोल्यांचा अभाव आहे. पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था नाही. रखखरत्या उन्हात दिवसभर विद्यार्थ्यांना वर्गात बसवून ठेवणे संयुक्तिक होणार नाही, असे पत्रात नमूद आहे. धारणी तालुका वगळता संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक शाळा १ मार्चपासून सकाळच्या सत्रात सुरू कराव्यात. त्याअनुषंगाने शिक्षणाधिकाºयांंना अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवावा लागणार आहे. शैक्षणिक बाबी परिपूर्ण करूनच प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात सुरू होतील, त्यानुसार कार्यवाही करावी, असे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी स्पष्ट केले.
शिक्षण विभाग लागला कामाला
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांचे पत्र धडकताच संपूर्ण विभाग कामाला लागल्याची माहिती मिळाली. जिल्ह्यात प्राथमिकच्या सुमारे १५०० शाळा आहेत. त्यानुसार शिक्षण विभागाने चाचपणी चालविली आहे. १ मार्चपासून सकाळच्या सत्रात प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबतचे पत्र याच आठवड्यात मुख्याध्यापकांना पोहचेल, असे संकेत मिळत आहे.