प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा सोमवारपासून ऑनलाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:10 AM2021-06-23T04:10:32+5:302021-06-23T04:10:32+5:30
अमरावती : शैक्षणिक सत्र २०२०-२१ साठी जिल्ह्यातील सर्व शाळांचे व्यवस्थापन आणि सर्व माध्यमांच्या शाळा २८ जूनपासून ऑनलाईन व अन्य ...
अमरावती : शैक्षणिक सत्र २०२०-२१ साठी जिल्ह्यातील सर्व शाळांचे व्यवस्थापन आणि सर्व माध्यमांच्या शाळा २८ जूनपासून ऑनलाईन व अन्य माध्यमातून सुरू होणार आहेत. यासंदर्भातील आदेश २२ जून रोजी प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी जारी केला. सदर आदेशानुसार गटशिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी यांनी शाळांना दिलेल्या सूचनेप्रमाणे अंमलबजावणी करायची आहे.
शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये शिक्षणाधिकाऱ्यांच्या पत्रानुसार इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीसाठी ५० टक्के शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य आहे. इयत्ता दहावी व बारावीसाठी १०० टक्के शिक्षक उपस्थिती आवश्यक आहे. शिक्षकेतर कर्मचारी, प्राथमिक, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आदींचीही १०० टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. दहावी आणि बारावीचा निकाल तयार करण्यासाठी मूल्यांकनाचे काम सुरू असून, मर्यादित वेळेत सदर निकाल घोषित करावयाचे असल्याने जिल्ह्यातील दहावी व बारावीला शिकविणाऱ्या शिक्षकांची उपस्थिती शंभर टक्के अनिवार्य आहे.
बॉक्स
ऑनलाईन शिक्षण
कोविड-१९ च्या परिस्थितीमुळे पुढील सूचनेपर्यंत शाळा बंद असल्या तरी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (पुणे) यांनी दिलेल्या मार्गदर्शनक सूचनांप्रमाणे ऑनलाईन व इतर माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरळीतपणे सुरू राहील, याची दक्षता संबंधितांनी घ्यावी. सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळांना लेखी आदेश देऊन त्याचा अहवाल शिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर करण्याचे आदेश अनिनस्थ यंत्रणेला दिले आहेत.