‘सैराट’मधील 'प्रिन्सदादा' अमरावतीकर राणीच्या प्रेमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2022 07:00 AM2022-04-10T07:00:00+5:302022-04-10T07:00:06+5:30
Amravati News ‘सैराट’मधील हा प्रिन्स अमरावतीकर राणीच्या प्रेमात पडलाय. ते दोघे लवकरच अमरावती मुक्कामी विवाहबद्ध होत आहेत.
अमरावतीः सूरज पवार... ‘सैराट’मधील प्रिन्स. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील पोफळज येथील कोवळा पोरगा. अल्पवयात हीरो ते खलनायकाचा प्रवास करणाऱ्या सूरजला खरे प्रकाशमय करण्याचे सारे श्रेय तसे नागराज मंजुळेंचे. नागराज यांच्या आतापर्यंतच्या सर्व चित्रपटांत स्थान मिळविलेल्या ‘प्रिन्स’ अर्थात सूरजसाठी नागराज म्हणजेच आई-बाबा. ‘पिस्तुल्या’ केल्यावर अर्थात ९-१० वर्षांचा असल्यापासून तो नागराजच्या कुटुंबासोबत राहतोय. अलीकडे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबतही त्याने ‘झुंड’मध्ये स्क्रीन शेअर केली आहे. ‘सैराट’मधील हा प्रिन्स अमरावतीकर राणीच्या प्रेमात पडलाय. ते दोघे लवकरच अमरावती मुक्कामी विवाहबद्ध होत आहेत. कालपरवा पहिल्यांदा सासरी आल्यानंतर त्याने ‘लोकमत’ला सदिच्छा भेट दिली. लाजऱ्या-बुजऱ्या सूरजने दिलखुलास संवाद साधला.
पाच वर्षांपूर्वी ‘सैराट’ चित्रपट आल्यानंतर आर्ची, परश्या, लंगड्या, सल्या, प्रिन्स यांची क्रेझ सर्वांमध्येच पाहायला मिळाली. यात आर्चीच्या भावाची, परश्याचा मेहुणा ‘प्रिन्स’ची भूूमिका साकारली सूरज पवार याने. ‘पिस्तुल्या’मधल्या या हीरोने ‘सैराट’मध्ये खलनायकाच्या भूमिकेतही एक वेगळी छाप पाडली. ‘पिस्तुल्या’मध्ये पारधी समाजातील मुलगा, ‘फँड्री’तील जब्याचा दोस्त आणि ‘सैराट’मधील आर्चीचा भाऊ अन् आता मंजुळेंच्या बच्चन स्टारर ‘झुंड’मधील गेस्ट अपियरन्स. सूरजने वयाच्या १८ व्या वर्षी खलनायक साकारला.
जवळपास ९-१० वर्षांचा असल्यापासून तो नागराज यांच्या कुटुंबासोबत राहतोय. या कुटुंबाने त्याला आपलंसं करून घरातील सदस्य बनवून घेतले आहे. तो स्वत:ही ‘अण्णा माझ्यासाठी सर्व काही’ असल्याची प्रांजळ कबुली देतो. मास्तरांच्या भीतीने शाळा अर्धवट सोडणाऱ्या सूरजने आईच्या मृत्यूनंतर शिक्षणाचा प्रवास पुन्हा सुरू केलाय. तो नागराज मंजुळेंसोबत पुण्याला राहतोय. शिकल्यानंतरच मला माझा मार्ग निवडणे अधिक सोपे जाईल, हे सांगण्यासही सूरज विसरला नाही. आज पाच वर्षांनंतरही सैराटची जादू प्रेक्षकमनावर कायम आहे हे नक्कीच दिसून येते. मला डेली सोप करायला आवडत नाहीत, चित्रपटच आवडतात आणि तेच करीत राहणार, असे सांगणाऱ्या सूरजचा ‘घर, बंदूक, बिर्याणी’ हा चित्रपट लवकरच येतोय.
-----------------------------------------------------