प्रधान सचिवांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ : आदिवासी आश्रमशाळांमध्ये ‘ई- लर्निंग’ची धूम
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 05:27 PM2018-11-19T17:27:53+5:302018-11-19T17:28:28+5:30
आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळांमध्ये हल्ली ‘ई- लर्निंग’ची धूम सुरू झाली आहे.
- गणेश वासनिक
अमरावती - आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळांमध्ये हल्ली ‘ई- लर्निंग’ची धूम सुरू झाली आहे. दऱ्या-खोऱ्यात, वस्ती, पाड्यावरील आदिवासी विद्यार्थ्यांना अस्खलित इंग्रजी भाषेचे संभाषण, वाचन अवगत व्हावे, यासाठी ‘ट्रायबल’च्या प्रधान सचिवांनी ‘ड्रीम प्रोजेक्ट’ म्हणून या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली आहे.
राज्यात नाशिक, ठाणे, अमरावती व नागपूर या चारही अपर आयुक्त कार्यालयांतर्गत २९ एकात्मिक प्रक ल्प अधिकारी कार्यालय अधिनस्थ असलेल्या ५२५ आश्रमशाळांमध्ये ‘ई-लर्निंग’चे शिक्षण दिले जाणार आहे. त्याअनुषंगाने आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा यांनी शुक्रवार, १६ नोव्हेंबर रोजी चारही अपर आयुक्त कार्यालयांतील शिक्षण विभागाशी निगडित अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबत आॅनलाईन संवाद साधला. शिक्षक, मुख्याध्यापकांमध्ये ‘ई-लर्निंग’बाबतीतील गैरसमज, अनास्था व अडीअडचणींविषयी त्यांनी मत जाणून घेतले. यापूर्वी ठाणे, नाशिक अपर आयुक्त कार्यालयांतर्गत चेन्नई येथील एका खासगी संस्थेमार्फत शासकीय आश्रमशाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकांसाठी ‘करडीपथ’ नावाचे प्रशिक्षण राबविण्यात आले. आता हीच संस्था धारणी येथे प्रायोगिक तत्त्वावर आश्रमशाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकांना आॅडिओ, व्हिडीओच्या माध्यमातून ई-लर्निंगसंदर्भात प्रशिक्षण देण्यात येत आहे. बदलत्या काळानुसार आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात बदल अपेक्षित असल्यामुळे इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे ई-लर्निंग शिक्षणाची पायाभरणी केली जात आहे. विद्यार्थ्यांच्या मनातून इंग्रजी विषयाची भिती दूर करण्यासाठी शिक्षकांसह विद्यार्थी हल्ली अद्ययावत प्रशिक्षण घेत आहे. सध्या आश्रमशाळांमध्ये एलसीडी प्रोजेक्टरद्वारे काही विषयांचे अध्ययन दिले जाते. मात्र, लवकरच सर्वच शासकीय आश्रमशाळा ई-लर्निंगमय केले जाणार आहेत. पुढील वर्षी सन २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षात आदिवासी विद्यार्थ्यांच्या शासकीय आश्रमशाळांमध्ये ई- लर्निंग शिक्षण सुरू होईल, अशी पायाभरणी करण्यात येत आहे.
आश्रमशाळांचे कायापालट तपासणी २५ नोव्हेंबरपासून
आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळांमध्ये पायाभूत, भौतिक सुविधांची तपासणी २५ नोव्हेंबरपासून केली जाणार आहे. त्याकरिता अपर आयुक्त, प्रकल्प अधिकारी स्तरावर स्वतंत्र पथक गठित करण्यात आले आहेत. आश्रमशाळांमध्ये पथक भेटीदरम्यान फर्निचर, स्वच्छतागृह, स्वयंपाकगृह, भोजनकक्ष, कोठीगृहे, विद्युतपुरवठा, शालेय इमारत दुरूस्ती, बिल्डिंग स्वच्छता, वसतिगृह दुरूस्तीचे निरीक्षण करतील, असे प्रधान सचिवांनी स्पष्ट केले आहे.
आश्रमशाळांमध्ये सुधारणा करण्यासाठी शासनाने ‘कायापालट’ हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ई-लर्निंग हा अतिशय महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत ई-लर्निंग प्रकल्प मोलाचा ठरणारा आहे.
- नितीन तायडे,
उपायुक्त, आदिवासी विकास विभाग, अमरावती