मूलभूत गरजांना प्राधान्य, रोजगारासाठी स्वतंत्र नियोजन - सुधीर मुनगंटीवार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 09:39 PM2019-01-21T21:39:31+5:302019-01-21T21:39:50+5:30
कृषी क्षेत्राशी संबंधित रोजगाराच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा योजनेत समावेश करावा, रोजगार विषयासाठी स्वतंत्र नियोजन करण्याचे निर्देश वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी दिले.
अमरावती : आरोग्य, शिक्षण, रोजगार व पाणी या मूलभूत गरजांना प्राधान्य देऊन त्यानुसार वार्षिक नियोजन तयार करावे. त्यासाठी पुरेसा निधी देऊ, तसेच कृषी क्षेत्राशी संबंधित रोजगाराच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा योजनेत समावेश करावा, रोजगार विषयासाठी स्वतंत्र नियोजन करण्याचे निर्देश वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी दिले.
विभागातील पाचही जिल्ह्यांच्या वार्षिक नियोजनाची बैठक वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात झाली, त्यावेळी ते बोलत होते. वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर, ना. प्रवीण पोटे, ना. डॉ.रणजीत पाटील, ना.मदन येरावार, खा.आनंदराव अडसूळ, खा. रामदास तडस, आ.डॉ. सुनील देशमुख, आ.डॉ. अनिल बोंडे, आ.वीरेंद्र जगताप, आ.रमेश बुंदिले, आ.प्रभुदास भिलावेकर, आ.राजेंद्र पाटणी, आ. अशोक उईके, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांच्यासह विभागातील पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी उपस्थित होते. मत्स्यव्यवसाय, दुग्धोत्पादन, कृषिआधारित व्यवसाय आदींचा विकास व स्थानिक रोजगार निर्मितीच्या शक्यता असल्यास त्याला निधी कमी पडू दिला जाणार नाही. मानव विकास योजनेत समाविष्ट गावांत अंगणवाडींचे प्रस्ताव तातडीने सादर करावे, असे ना.मुनगंटीवार यांनी सांगितले.
असे आहे जिल्हानिहाय नियोजन
*अमरावतीत जिल्ह्यात संत गाडगेबाबा यांचे जन्मस्थान असलेल्या शेंडगाव विकासासाठी १८.७५ कोटी, अंजनगाव सुर्जी येथे ५० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयासाठी निधी. धामक येथील आरोग्य केंद्राला दोन कोटी रुपये.
* यवतमाळ जिल्ह्यात खनिज विकास निधीतून आरोग्य, पाणी व शाळांसाठी खर्च करावा. शेतीशी संबंधित रोजगार निर्मितीवर भर, यवतमाळ येथील १०० खाटांच्या रुग्णालयासाठी पुरेसा निधी.
* बुलडाणा जिल्ह्यात प्रस्तावानुसार प्राथमिक शाळांसाठी १५ कोटी, अंगणवाडी, शासकीय इमारतीसाठी ३ कोटी व महिला रुग्णालयासाठी १.५ कोटी रुपये.
*वाशीम जिल्ह्यात ग्रामपंचायत भवनासाठी ७.६८ कोटी, जलयुक्तच्या इंधन खचार्साठी १० कोटी, वन्यप्राण्यांपासून संरक्षणासाठी तारेचे कुंपण उभारण्यासाठी निधी वनविभागाकडून निधी.
* अकोला जिल्ह्यात शेतक-यांंना अनुदान तत्वावर ट्रॅक्टरवाटपासाठी १५ कोटी, प्राथमिक शाळांसाठी ४.५कोटी, अकोल्यात कर्करोग उपचार रुग्णालय व १०० खाटांच्या रुग्णालयासाठी निधी मिळवून देण्यात येईल.