डिसेंबरपर्यंत एक लाख कृषिपंपाची प्राधान्याने वीज जोडणी; संजय ताकसांडे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2022 12:08 PM2022-11-17T12:08:01+5:302022-11-17T12:15:13+5:30
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे शेतकऱ्यांचे दिवसा वीजपुरवठ्याचे स्वप्न पूर्ण होणार
अमरावती : राज्यात पैसे भरूनही प्रलंबित असलेल्या एक लाख कृषी पंपांना डिसेंबर २०२२ पर्यंत वीज जोडणी देण्याचे उद्दिष्ट महावितरणचे आहे. त्यानुसार अधिकाऱ्यांनी प्रयत्न करण्याचे निर्देश महावितरणचे संचालक संजय ताकसांडे यांनी दिले. ते अमरावती परिमंडळ कार्यालयातील प्रकाशसरिता सभागृहातील आढावा बैठकीत बोलत होते.
अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात ० ते ३० मीटर अंतर पैसे भरून असलेल्या ७१ कृषी पंपांना पुढील दोन दिवसांत वीज जोडण्या कराव्यात तसेच उपलब्ध असलेल्या अनुक्रमे १६ आणि ११ कोटींच्या आकस्मिक निधीच्या कामाचे शंभर टक्के आदेश काढून ३१ ते २०० मीटर अंतर असलेल्या वीज जोडणी तसेच कृषी आकस्मिक निधी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले.
२०१ ते ६०० मीटर अंतरापर्यंत असलेल्या वीज जोडणीसाठी जिल्हा पातळीवर निधी उपलब्ध करून देण्यात आल्याने त्यादृष्टीने वीज जोडणीच्या कामाला गती देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या तसेच वितरण हानी जास्त असलेल्या परिमंडळातील १३ वाहिन्यांवर विशेष लक्ष देऊन त्या वाहिन्यांची वितरण हानी कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. सद्य:स्थितीत वीजमीटर मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ग्राहकांची अडवणूक होता कामा नये. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे शेतकऱ्यांचे दिवसा वीजपुरवठ्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेत जास्तीत जास्त जागा मिळावी, यासाठी जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा करून जागा मिळविण्याच्या सूचना अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांना दिल्या. बैठकीला प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण, उपमहाव्यवस्थापक प्रमोद खुळे, अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे, सुरेश मडावी, दीपक देवहाते, हरीश गजबे, वाय. डी. मेश्राम तसेच परिमंडळ कार्यालयातील सर्व कार्यकारी अभियंते, कार्यकारी अभियंता चाचणी, कार्यकारी अभियंता स्थापत्य यांच्यासह उपविभागीय अभियंतेही उपस्थित होते.