महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी एमआयडीसीत प्राधान्याने जागा देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 01:32 PM2024-09-28T13:32:45+5:302024-09-28T13:35:27+5:30

उदय सामंत : विश्वकर्मा योजनेत ३० हजार किट वाटप

Priority space will be given in MIDC to encourage women entrepreneurs | महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी एमआयडीसीत प्राधान्याने जागा देणार

Priority space will be given in MIDC to encourage women entrepreneurs

लोकमत न्यूज नेटवर्क 
अमरावती :
उद्योग क्षेत्रामध्ये राज्य आघाडीवर आहे. उद्योग क्षेत्रामध्येही स्त्री सक्षमीकरणाच्या दृष्टीने महिलांचा टक्का वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी एमआयडीसीच्या क्षेत्रामध्ये स्वतंत्र भूखंड उपलब्ध करून दिले जातील, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. शुक्रवारी महाराष्ट्राची उद्योगभरारी कार्यक्रम शहरात पार पडला. यावेळी आमदार रवी राणा, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातूरकर आदी उपस्थित होते.


ग्रामीण पातळीवर रोजगार निर्माण करणारी विश्वकर्मा योजना अमरावती जिल्ह्यात चांगल्या पद्धतीने राबविण्यात आली आहे. या योजनेत ५० हजारच्या जवळपास नोंदणी झाली. यातील ३० हजार लाभार्थीना किटचे वाटप करण्यात आले. दोन वर्षांत ३५ हजार युवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.


ग्रामीण पातळीवरील रोजगारासह मोठे उद्योग राज्यात येण्यासाठी उद्योग विभाग कार्य करीत आहे. राज्यातील एकही उद्योग बाहेर जाऊ दिल्या जाणार नाही. त्यासोबतच गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात स्टील क्षेत्रातील गुंतवणूक होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. येत्या एक वर्षात येथील चित्र बदलेले असेल. संपूर्ण बाजारपेठेचा उद्योग क्षेत्राशी संबंध येतोच. त्यामुळे सामाजिक सक्षमीकरण करताना उद्योग क्षेत्राचा विचार करावाच लागतो. 


लाडकी बहीण योजनेतून महिलांचे सक्षमीकरण करीत असताना त्यांना मिळालेल्या मदतीतून बाजारपेठेतील आवश्यक वस्तूंची खरेदी होत असल्यामुळे एका दृष्टिकोनातून अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे. त्यामुळे राज्याचा आर्थिक कणा मजबूत करण्यासाठी उद्योग क्षेत्राचा विकास करणे गरजेचे आहे. 


विदर्भाचा विकास व्हावा यासाठी नांदगाव पेठ येथे पीएम मित्रा टेक्सटाइल पार्क उभारण्यात येणार आहे. उद्योग क्षेत्रात सक्षमीकरणाच्या दृष्टीने ही महत्त्वाची नांदी आहे. कार्यक्रमात विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभाचे वितरण करण्यात आले. 


माहिती न देणाऱ्या एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना देऊ नोटीस 
जिल्ह्यातील नवनवीन आलेले उद्योग तसेच आलेल्या कंपन्यांविषयी एमआयडीसीचे आरओ माहिती देत नसल्याची तक्रार उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे पत्रकारांनी केली. यावेळी संबधित आरओ यांनी असे करू नये, त्यांनी जे काही चांगलं किंवा वाईट असेल ती माहिती माध्यमांना द्यायला हवी. दर आठवड्याला एमआयडीसीमध्ये घडणाऱ्या घडामोडींची माहिती देण्याची नोटीस आरओंना देणार असल्याचे उदय सामंत म्हणाले.

Web Title: Priority space will be given in MIDC to encourage women entrepreneurs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.