बहुजनांच्या अस्मिता बनल्या तुरूंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 09:22 PM2019-03-10T21:22:11+5:302019-03-10T21:22:32+5:30
बहुजन समाज व नेत्यांना एकत्र येण्यासाठी धार्मिक अस्मितेची मोठी बाधा ठरत आहे. त्यांच्या अस्मिता या तुरूंग बनल्या आहेत. या अस्मितेने आमच्यातील माणुसकी मारली. हजारो वर्षे आपली हानी याच अस्मितेने केली. जाती धर्माच्या अस्मितेसाठी आम्ही महापुरूषांना वाटून घेतले, अशी टीका ज्येष्ठ साहित्यीक डॉ. यशवंत मनोहर यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बहुजन समाज व नेत्यांना एकत्र येण्यासाठी धार्मिक अस्मितेची मोठी बाधा ठरत आहे. त्यांच्या अस्मिता या तुरूंग बनल्या आहेत. या अस्मितेने आमच्यातील माणुसकी मारली. हजारो वर्षे आपली हानी याच अस्मितेने केली. जाती धर्माच्या अस्मितेसाठी आम्ही महापुरूषांना वाटून घेतले, अशी टीका ज्येष्ठ साहित्यीक डॉ. यशवंत मनोहर यांनी केले.
मातोश्री विमलबाई देशमुख सभागृहात नवव्या कॉम्रेड अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. दोन दिवसीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन कामगार नंदू नेतनवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर साहित्यिक उत्तम कांबळे, भालचंद्र कानगो, नरेशचंद्र ठाकरे उपस्थित होते.
मनोहर म्हणाले, खोटारडेपणा, पोरकटपणा करणारे जर सत्तेत पुन्हा २०१९ निवडून आले तर ते फक्त आपल्या बौद्धिक दुर्बलतेमुळेच शक्य होईल. २०१९ हे तुमचे, माझे मृत्यू वर्ष ठरेल. बहुजनांना धार्मिक अस्मिता बाजुला सारून सत्तेसाठी एकत्र यावे लागेल. हेच या संमेलनाचे फलित असेल. २०१४ मध्ये त्यांची सत्ता येण्याचे कारण म्हणजे आम्ही बौद्धिक दृष्ट्या पांगळे झालो होतो. हे पांगळेपण त्यावेळी हा माझा नेता, ही माझी जात, हा माझा धर्म, हा माझा पक्ष या संकुचित अस्मितेमुळेच आले होते. ते आता पुन्हा होता कामा नये, यासाठी बहुजनांनी एकत्र यावे असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक काशीनाथ बुºहाटे, संचालन प्रसेजित तेलन यांनी केले. आभार विजय रोडगे यांनी मानले.
दलितांमधील मार्क्सवाद्यांबद्दलची तेढ अनाकलनीय
मार्क्सवादी आणि कम्युनिस्ट पक्षांनी इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत दलितांच्या हिताची नेहमीच बाजू घेतली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक आंदोलनात, मोर्चात डाव्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. कम्युनिस्टांवरील खटले बाबासाहेब लढले. असा इतिहास असतानाही दलित आणि मार्क्सवादी यांच्या असलेली तेढ मात्र अनाकलनीय आहे, असे प्रतिपादन विचारवंत उद्धव कांबळे यांनी केले. संमेलनाच्या उद्घाटन सत्रानंतर ‘आंबेडकर आणि मार्क्स : नवे आकलन, नव्या दिशा’ या विषयावर उद्धव कांबळे यांचे विशेष व्याख्यान पार पडले. यावेळी अमरावती विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यांकन विभागाचे माजी संचालक, सिनेट सदस्य बी. आर. वाघमारे अध्यक्षस्थानी होते.