कैद्याचा नागपुरात मृत्यू, गुन्ह्याची नोंद दीड महिन्यानंतर!
By प्रदीप भाकरे | Published: July 5, 2023 01:27 PM2023-07-05T13:27:49+5:302023-07-05T13:28:27+5:30
आरोपीला खून व मारहाणीप्रकरणी एप्रिल २०२२ मध्ये न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती.
अमरावती : येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याचा १७ मे रोजी नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र त्याच्या आकस्मिक मृत्यूबाबत पोलिसांना दीड महिन्यानंतर कळविण्यात आले. त्या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी नापोकॉं विजय सत्तार यांच्या तक्रारीवरून ४ जुलै रोजी सायंकाळी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला. रवींद्र भीमराव पांडे (६५, रा. मुज जामगाव, ता. वरूड) असे मृत कैद्याचे नाव आहे.
माहितीनुसार, पांडे याला खून व मारहाणीप्रकरणी एप्रिल २०२२ मध्ये न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. तो जिल्हा मध्यवर्ती कारागृहात ती शिक्षा भोगत असताना त्याने छातीत दुखत असल्याची तक्रार कारागृह प्रशासनाकडे केली होती. त्यामुळे त्याला येथील जिल्हा सामान्य रुग्णालय व तेथून पुढे नागपूरच्या सुपर स्पेशालिटी दवाखन्यात हलविण्यात आले होते. तेथे १७ मे रोजी रात्री ९ च्या सुमारास त्याचे हृद्यविकाराने निधन झाल्याचे कॉझ ऑफ डेथ तेथील डॉ. अनिल कांबळे यांनी दिले. त्याचे पार्थिव नागपूर मेडिकलमध्ये ठेवण्यात आले होते. ती मर्ग डायरी अमरावतीत पोहोचल्यानंतर ४ जुलै रोजी त्याच्या मृत्यीची पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली.