कैद्यांनो, आता थेट कारागृहातून स्मार्टकार्ड फोनने बोला; गृह विभागाचा निर्णय
By गणेश वासनिक | Published: November 2, 2023 06:50 PM2023-11-02T18:50:28+5:302023-11-02T18:50:39+5:30
तामिळनाडू येथील ॲलन ग्रृप पुरविणार सुविधा
अमरावती : राज्यातील कारागृहात बंदिस्त असलेल्या कैद्यांना आता कारागृहातून नातेवाईक, आप्त अथवा मित्रांसोबत थेट स्मार्टकार्ड फोनने संवाद करता येणार आहे. गृह विभागाने गुरूवारी याबाबतच्या निर्णयाला मान्यता दिली असून, सर्वच कारागृहांमध्ये बंदीजनांना स्मार्टकार्ड फोन सुविधा उपलब्ध होणार आहे.
पुणे येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहात बंद्यांकरीता स्मार्टकार्ड फोन सुविधा प्रायोगिक तत्त्वावर कार्यान्वित करण्यात आली असून अशा प्रकारे स्मार्टकार्ड फोन सुविधा ईतर सर्व कारागृहांतील बंद्यांकरीता राबविण्यासाठी शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.
तामिळनाडू येथील ॲलन ग्रृपने राज्याच्या कारागृहातील बंद्यांकरीता स्मार्टकार्ड फोन सुविधा सुरु करण्याची परवानगी मागितली होती. गृह विभागाकडे तसा प्रस्ताव सादर केला होता. पुणे येथील कारागृह प्रशासनाचे अपर पोलिस महासंचालक तथा महानिरीक्षक यांनी अभिप्राय सादर करण्याचे कळविले होते. त्यानुसार कारागृह उपमहानिरीक्षकांनी ॲलन ग्रुप यांच्याकडील स्मार्टकार्ड फोन सुविधा प्रस्तावास सहमती देऊन ती राबविण्यास हरकत नसल्याचे अभिप्राय दिले. पहिल्या टप्प्यात येरवडा मध्यवर्ती कारागृहात स्मार्टकार्ड फोन सुविधा प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आली आहे. या निर्णयामुळे बंदीजन हे कारागृहात मोबाईल नेण्याचा ‘चोरी चुपके’ मार्ग थांबवतील, असे स्पष्ट होते.
कारागृहांची सुरक्षा, शासन नियमांचे पालन अनिवार्य
कैद्यांना स्मार्टकार्ड फोनची सुविधा राबविताना कारागृहांची सुरक्षा व महाराष्ट्र कारागृह नियमावली, १९७९ मधील तरतुदी विचारात घेऊन नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करावी लागणार आहे. तसेच शासनाच्या इतर सर्व संबंधित विभागांची प्रचलित धोरणे, नियम व नियमावलींचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असणार आहे.
कारागृहातील अंतर्गत सुरक्षा ही महत्वाची असेल. त्यामुळे स्मार्ट कार्ड फोन सुविधेचा गैरवापर बंदीजनांकडून होणार नाही, याची कारागृह अधीक्षकांना खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे. - अमिताभ गुप्ता, महानिरीक्षक कारागृह प्रशासन