शिक्षा-कपातीपासून राज्यातील कैदी वंचित
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 07:31 AM2018-08-27T07:31:18+5:302018-08-27T07:36:17+5:30
कैद्यांच्या शिक्षा कपातीचे प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश कारागृह महानिरीक्षक डॉ. भूषण उपाध्याय यांनी २७ मे २०१६ रोजी राज्याचे मध्यवर्ती कारागृह, जिल्हा कारागृह, खुले कारागृह,
गणेश वासनिक
अमरावती : कैद्यांच्या शिक्षा कपातीचे प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश कारागृह महानिरीक्षक डॉ. भूषण उपाध्याय यांनी २७ मे २०१६ रोजी राज्याचे मध्यवर्ती कारागृह, जिल्हा कारागृह, खुले कारागृह, महिला कारागृहांच्या अधीक्षकांना दिले होते. तरीही पात्र कैद्यांना माफी पुस्तकावर घेण्याबाबतचे प्रस्ताव गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असल्याचे उघडकीस आले आहे.
महाराष्ट्र कारागृह माफी पद्धती नियम १९६२ मधील नियम २४(२) नुसार अधीक्षकांना कैद्यांची शिक्षा कमी करण्याचे अधिकार आहेत. त्यानुसार विभागीय कारागृह उपमहानिरिक्षकांच्या पूर्व मान्यतेने कैद्यांना माफी पुस्तकावर घेता येते. ज्या कैद्यांना कायमस्वरूपी माफी पुस्तकावरून कपात केल्याची शिक्षा देण्यात आली, अशा कैद्यांना पुन्हा माफी पुस्तकावर घेण्यासाठी कारागृह कार्यालय तसेच शासनाकडे अर्ज करता येतो. मात्र, २ ते ३ वर्षांच्या कालावधी होऊनही कारागृह महानिरिक्षकांच्या सूचनापत्राचे पालन करण्यात आले नाही. काही कैद्यांची वर्तणूक आणि वागणूक अतिशय चांगली असतानाही ते माफीच्या शिक्षेपासून वंचित असल्याचे वास्तव आहे.
नियमानुसार माफी कपात शिक्षेस पात्र कैद्यांचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला आहे. वरिष्ठांचे आदेश आल्यास त्यानुसार कार्यवाही केली जाईल.
- रमेश कांबळे, अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह, अमरावती.