अमरावतीत ‘जेल ब्रेक’ करून पसार झालेले कैदी मिळेनात; चौकशी समिती गठित, आज येणार पथक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2022 10:40 AM2022-06-30T10:40:41+5:302022-06-30T10:47:20+5:30
Amravati Jail : चंद्रपूर जिल्हा कारागृहाचे अधीक्षक वैभव आगे यांच्या नेतृत्वातील ती समिती आज ३० जून रोजी अमरावती मध्यवर्ती कारागृहात पोहोचून चौकशी करणार आहे.
अमरावती : येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहाची पोलादी सुरक्षाव्यवस्था भेदून पलायन केलेले तीन कैदी अद्यापही मिळालेले नाहीत. त्यांच्या शोधासाठी फ्रेजरपुरा पोलीस व कारागृह प्रशासनाने स्वतंत्र तपास पथके निर्माण केली आहेत. दरम्यान, या ‘जेल ब्रेक’ची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्हा कारागृहाचे अधीक्षक वैभव आगे यांच्या नेतृत्वातील ती समिती आज ३० जून रोजी अमरावती मध्यवर्ती कारागृहात पोहोचून चौकशी करणार आहे.
मंगळवारी पहाटे १.३० ते २.३० च्या सुमारास कारागृहातील बरॅकचे कुलूप तोडून व पुढे २३ फूट उंचीची भिंत ओलांडत त्या तिघांनी येथील मध्यवर्ती कारागृहातून पळ काढला होता. त्यात दोघे न्यायबंदी, तर एकजण जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. अल्पवयीन मुलीवरील बलात्कार व प्राणघातक हल्ला प्रकरणातील तीन कैदी कारागृहातील बरॅक नंबर १२ मध्ये होते. साहील अजमत कालसेकर (३३, नायसी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी), सुमित शिवराम धुर्वे (१९, बालापेठ, शेंदूर जनाघाट, ता. वरुड, जि. अमरावती) व रोशन गंगाराम उईके (२३, बालापेठ, शेंदूर जनाघाट) अशी पसार कैद्यांची नावे आहेत.
यांच्यावर तलवार?
तीनही बंद्यांनी पलायन केल्याचे रात्रपाळीतील कर्मचारी परमेश्वर लाड व गणेश पाटील यांच्या निदर्शनास आले. त्यांनी पहाटे २.४०च्या सुमारास ही माहिती वॉकीटॉकीद्वारे मुख्य द्वारावरील आज्ञांकित अधिकारी सुरेंद्र भोगरे, सुभेदार यांना दिली. प्राथमिकदृष्ट्या कारागृह रक्षकांवर जेल ब्रेकची जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे. याबाबत चाैकशी करण्यासाठी नागपूर कारागृह विभागाच्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे या मंगळवारीच अमरावती कारागृहात दाखल झाल्या होत्या. त्यांनी आपला प्राथमिक अहवाल उच्चपदस्थांना दिला आहे.
कोण आहेत वैभव आगे
चंद्रपूर जिल्हा कारागृहाचे अधीक्षक असलेले वैभव आगे हे कारागृहाची अंतर्गत सुरक्षेत मास्टर समजले जातात. ते भायखळा येथे असताना त्यांच्याकडे २६/११च्या हल्ल्यातील एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाबच्या सुरक्षेची जबाबदारी होती. त्यांची त्यासाठी विशेष नियुक्ती केल्याने ते रोज भायखळा ते ऑर्थर रोड ये-जा करायचे. त्यांनी अमरावती कारागृहातदेखील कर्तव्य बजावले आहे. त्यांच्याकडे अमरावती जेल ब्रेकची चौकशी देण्यात आली आहे. ते गुरुवारी सकाळी अमरावतीत पोहोचणार आहेत.