कारागृहात ८८५ रुपयांत कैद्यांना मिळणार गादी
By गणेश वासनिक | Published: July 15, 2023 08:15 PM2023-07-15T20:15:20+5:302023-07-15T20:15:41+5:30
कॅन्टीनमधून होणार उपलब्ध : निविदा आटोपल्या, ४० वर्षांवरील कैद्यांना घेता येणार गादी
अमरावती : राज्याच्या कारागृहात कैद्यांची नातेवाइकांसोबत ई-भेट या उपक्रमानंतर आता ४० वर्षांवरील पुरुष कैदी आणि एकूणच महिला कैद्यांना गादी विकत घेता येणार आहे. ही सुविधा कारागृहातील कॅन्टीनमध्ये उपलब्ध असणार आहे. त्याकरिता निविदा प्रक्रिया आटोपली असून, ८८५ रुपयांत एक गादी मिळेल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
पुणे येथील कारागृह महानिरीक्षकांच्या आदेशानुसार कैद्यांना गाद्या पुरविण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. आता मध्यवर्ती कारागृह, जिल्हा कारागृह, विशेष कारागृह, खुले कारागृह, महिला कारागृह आदी कारागृहांमधृन गाद्यांची मागणी नोंदविली जात आहे. कैद्यांच्या नोंदणीनुसार कॅन्टीनमधून गाद्या पुरविल्या जातील. गादी खरेदीचे पैसे हे कॅन्टीनमध्येच भरावे लागणार आहेत. ४० वर्षांवरील पुरुष कैद्यांनाच गादी उपलब्ध होणार असून, महिला कैद्यांना त्याच्या मागणीनुसार गादी दिली जाणार असल्याचे वरिष्ठांच्या पत्रात नमूद आहे. मानवाधिकार आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कारागृह प्रशासनाने कैद्यांना गादी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. हल्ली कैद्यांना कारागृह प्रशासनाकडून सतरंजी, दोन कांबळी, एक चादर आणि उशी असे नि:शुल्क दिले जाते.
कैद्यांसाठी कॅन्टीन ठरतेय केंद्रबिंदू
चांद्यापासून, तर बांद्यापर्यंत कारागृहात विविध गुन्ह्याच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना अलीकडे कॅन्टीन मोठा
आधार ठरत आहे. दैनंदिन आवश्यक वस्तू, साहित्याचा पुरवठा हा कॅन्टीनमधून होतो. स्नॅक्स, ब्रेड, खाद्यपदार्थ, गूळ, पापड, शेंगदाणे, फळे, ड्रायफ्रूटस् यासह मटण, चिकनही मिळते. त्यामुळे शिक्षा भोगत असताना बहुतांश कैद्यांसाठी कॅन्टीन हे केंद्रबिंदू ठरत आहे. कॅन्टीनमधून वस्तू, साहित्य पुरवठा करण्यासाठी तीन महिने कालावधीच्या निविदा काढल्या जातात, हे विशेष