शासकीय टँकरला खासगी मुंडके; नादुरुस्त दाखवून उकळले पैसे!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 05:27 PM2023-01-11T17:27:50+5:302023-01-11T17:29:01+5:30
शासनाला चुना, वन्य प्राण्यांच्या पाण्यासाठी पाण्यासारखा व्यर्थ खर्च
चिखलदरा (अमरावती) : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल वन्यजीव विभागात वन्य प्राण्यांसाठी अतिसंरक्षित जंगलातील पाणवठे पाण्याने भरण्यासाठी शासकीय टँकर दुरुस्त असताना नादुरुस्त दाखवून खासगी ट्रॅक्टरला शासकीय टँकर लावून सहा लाखांच्या जवळपास देयके काढण्यात आल्याचा प्रकार पुढे आला असून या प्रकरणाची तक्रारही वनमंत्र्यांना करण्यात आली आहे.
गुगामल वन्यजीव विभागाच्या चिखलदरा परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या वैराट चाटीबल्डा मेमना परिसरात गतवर्षी फेब्रुवारी ते जून २०२२ मध्ये वन्य प्राण्यांना अतिसंरक्षित जंगलात पिण्याच्या पाण्यासाठी वन वन भटकंती करावी लागू नये यासाठी कृत्रिम व काही नैसर्गिक पाणवठे कोरडे पडल्याने पाण्याने भरण्यासाठी शासकीय ट्रॅक्टर व टँकर दुरुस्त असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करीत संबंधित अधिकाऱ्यांनी शासकीय टँकरला खासगी ट्रॅक्टरचे मुंडके लावून पाच ते सहा लाख रुपयांचे देयके काढण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली असून त्या संदर्भात योग्य चौकशी करून संबंधिताविरुद्ध कारवाई करण्याची मागणी वनमंत्र्यांना एका तक्रारीद्वारे करण्यात आली आहे.
२५ ऐवजी शंभर टक्के खर्च : शासनाला चुना!
शासकीय ट्रॅक्टर दुरुस्त असताना खासगी कंत्राटदाराच्या ट्रॅक्टरला टँकर लावून वन्य प्राण्यांसाठी पाणी टाकण्यात आले. त्यावर शासनाला लागणारा २५ टक्के खर्च सोडून शंभर टक्के खर्च करण्यात आला. शासनाला भुर्दंड बसविणाऱ्या संबंधितांविरुद्ध वरिष्ठ अधिकारी चौकशी करून सत्य तपासून कारवाई करतील का, असा प्रश्न करण्यात आला आहे
कमिशनखोरीचा प्रकार ?
मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत गुगामल वन्यजीव विभागामध्ये मोठ्या प्रमाणात मनमर्जीप्रमाणे कामे करून लाखो रुपयांची देयके खामगाव वाशिम येथील कंत्राटदाराला आणून केली जात असल्याचा प्रकार उघड झाला. जेसीबीनंतर गॅबियन बंधारे बांधण्यात आल्याची चर्चा आहे असे असताना वन्य प्राण्यांच्या नावावर पिण्याच्या पाण्यात लावलेल्या टँकरमध्येसुद्धा कमिशनखोरीचा प्रकार असल्याचा आरोप त्या निनावी तक्रारीत वनमंत्र्यांना करण्यात आला आहे.