खासगी रुग्णालयांचे ऑडिट झाले; रुग्णांना अतिरिक्त बिलाच्या पैसे परतीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:10 AM2021-06-10T04:10:01+5:302021-06-10T04:10:01+5:30
जिल्हाधिकारी पथकाचा अहवाल, महापालिका आयुक्तांकडे डॉक्टरांकडून पैसे वसुलीची जबाबदारी अमरावती : शहरातील सात खासगी रुग्णालयांनी कोरोना रुग्णांकडून आगाऊ बिल ...
जिल्हाधिकारी पथकाचा अहवाल, महापालिका आयुक्तांकडे डॉक्टरांकडून पैसे वसुलीची जबाबदारी
अमरावती : शहरातील सात खासगी रुग्णालयांनी कोरोना रुग्णांकडून आगाऊ बिल आकारल्याप्रकरणी जिल्हाधिकारी यांच्याद्धारा गठित ऑडिट पथकाने १.३० कोटी रूपये रुग्णांना परत करण्याबाबतचा अहवाल महापालिका आयुक्तांना दिला. मात्र, आतापर्यंत केवळ खासगी रुग्णालयांना पैसे वसुलीसाठी नोटीस बजावण्यात आली. पण, रुग्णांना पैसे परत कधी मिळणार, हा प्रश्न कायम आहे.
मार्च ते सप्टेंबर २०२० या दरम्यान खासगी रुग्णालयांनी कोरोना रुग्ण अथवा नातेवाईकांकडून अव्वाच्या सव्वा अतिरिक्त देयके वसूल करण्यात आले होते. परिणामी ऑडिट करण्यासाठी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी चार लेखापालांची समिती नेमली होती. त्याअनुषंगाने २६०० रुग्णांचे बिल तपासण्यात आले. या पथकाने शहरातील नामांकित खासगी रुग्णालयांनी कोरोना रुग्णांची लूट केल्याचा ठपका ठेवला आणि १.३० कोटी रुपये जास्तीचे वसूल केले. ते रुग्णांना परत करण्याबाबतचा अहवाल सादर करण्यात आला आहे. मात्र, महापालिका प्रशासनाकडून खासगी रुग्णांलयांच्या डॉक्टरांना पैसे वसूल करण्यासाठी नोटीस बजावली. पुढे काहीच नाही, अशी स्थिती आहे.
------------------
अशी आहे आकडेवारी
कोरोनावर उपचार केले जाणारे शहरातील हॉस्पिटल : २८
जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केले ऑडिटर्स : ०४
बिल जास्त घेतल्याच्या तक्रारीची संख्या : २६००
---------------
कोरोना रुग़्णांकडून जास्तीचे पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने खासगी कोविड रुग्णालयांचे ऑडिटसाठी चार पथक नेमले होते. या पथकाने अहवाल सादर केला असून, आता खासगी रुग्णालयांकडून ही रक्कम वसूल करून ती रुग्ण अथवा नातेवाईंकांना देणे अपेक्षित आहे.
- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी.
-------------------
३० जूनपर्यंत रुग्णांना पैसे परत करण्याची डेडलाईन
जिल्हाधिकारीद्धारा गठित पथकाने सादर केलेल्या अहवालात १.३० कोटी रुपये खासगी हॉस्पिलटच्या डॉक्टरांकडून वसूल करून ते रुग्ण अथवा नातेवाईकांना ३० जूनपर्यंत परत करणे अपेक्षित असल्याचे मत नोंदविले आहे. त्याअनुषंगाने महापालिका प्रशासनाकडून कारवाई अपेक्षित आहे. तथापि, खासगी डॉक्टरांना नोटीस बजावली असली तरी सक्ती करण्यात येत नाही, अशी माहिती आहे.