रात्रीचे काम करण्यासाठी ठेवली खासगी व्यक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 11:44 PM2017-11-15T23:44:03+5:302017-11-15T23:44:26+5:30
येथील महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे विजेसंबंधी तक्रार केल्यावर ‘आम्ही खासगी व्यक्ती रात्रीचे कामे करण्यास नियुक्त केला आहे.
विलास खाजोणे
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राम्हणवाडा थडी : येथील महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे विजेसंबंधी तक्रार केल्यावर ‘आम्ही खासगी व्यक्ती रात्रीचे कामे करण्यास नियुक्त केला आहे. त्यास आम्ही पगारातून पैसे देतो’, असे चमत्कारी उत्तर दिले आहे. यामुळे महावितरणचा कारभार चव्हाट्यावर आला असून तक्रारीची साधी दखलही घेतली जात नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
महाविरतणच्या गलथान कारभारामुळे येथील नागरिक त्रस्त असून कनिष्ठ अभियंता यांचे कर्मचाऱ्यावर कोणत्याच प्रकारचे नियंत्रण नाही. यामुळे तक्रार केल्यास कारवाई होत नाही, तर अधिकाऱ्यांचे आदेश धुडकावून लावण्याचा प्रताप अधिनस्त कर्मचारी करीत आहेत. दुसरीकडे रात्रीच्या वेळी येथे एकही कर्मचारी उपस्थित राहत नाही. ज्या वायरमन व लाईनमनची ड्युटी लागलेली असते ते आम्ही येथे रात्रीला उपस्थित राहत नसतो. विशेष म्हणजे, येथील वायरमनने पवार व राहुल ढगे यांनी ‘आम्ही खासगी व्यक्ती रात्रीचे कामे करण्यास नियुक्त केलेला आहे. त्यास आम्ही पगारातून पैसे देतो’, असे चमत्कारिक उत्तर दिले. यामुळे ब्राह्मणवाडा थडी परिसरातील नागरिकांमध्ये आक्रोश वाढला आहे.
ब्राम्हणवाडा थडी परिसरात सुमारे ३० हजार लोकसंख्या असून व ५० टक्के शेतजमीन ओलिताखाली आहे. यामुळे विजेच्या तक्रारींची संख्याही मोठी आहे. गावकऱ्यांच्या विजेच्या तक्रारींचा निपटारा होत नसल्याने गावातील नागरिकांना अंधारात रात्र काढावी लागते. तसेच शेतातील रोहित्राचे काम निघाल्यास कर्मचारी उपलब्ध होईपर्यंत सिंचनापासून वंचित राहावे लागते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावर उत्तर देण्याचे टाळले.
आपल्या जागेवर नाईट ड्युटीसाठी कोणत्याही खासगी व्यक्तीची नियुक्ती करता येत नाही. अशा कर्मचाऱ्यास योग्य समज दिली जाईल.
- सुधीर वानखडे,
उपकार्यकारी अभियंता, चांदूरबाजार