खासगी वाहनधारकांना फटकारले!

By admin | Published: November 23, 2014 11:12 PM2014-11-23T23:12:03+5:302014-11-23T23:12:03+5:30

जिल्हा वाहतूक शाखेच्या चमूने मोर्शीला येऊन खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांना राज्य परिवहन महामंडळाच्या २०० मीटर प्रतिबंधित क्षेत्रातून प्रवासी वाहतूक करण्यात येऊ नये, वाहने उभे करण्यात येऊ नये,

Private vehicle holders shouted! | खासगी वाहनधारकांना फटकारले!

खासगी वाहनधारकांना फटकारले!

Next

मोर्शी : जिल्हा वाहतूक शाखेच्या चमूने मोर्शीला येऊन खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांना राज्य परिवहन महामंडळाच्या २०० मीटर प्रतिबंधित क्षेत्रातून प्रवासी वाहतूक करण्यात येऊ नये, वाहने उभे करण्यात येऊ नये, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असे ठणकावून सांगितले. यावरुन सध्या तरी बस स्थानकासमोर खासगी प्रवासी वाहने उभी राहणे बंद झाले आहे.
‘मोर्शी बसस्थानकासमोर अवैध प्रवासी वाहतूक, प्रवाशांची कोंडी’ या आशयाची बातमी ‘लोकमत’ च्या २१ नोव्हेंबरच्या अंकात प्रकाशित होताच, थेट जिल्हा वाहतूक पोलीस शाखेचे निरीक्षक राजेश गवळी आणि त्यांची चमू मोर्शीला दाखल झाली. त्यांनी येथील आगारव्यवस्थापक डफळे यांची भेट घेऊन परिस्थितीची माहिती प्राप्त करुन घेतली. बसस्थानकासमोर खासगी प्रवासी वाहने थांबतात, या खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांना वाहने दूर नेण्याविषयी सांगितल्यावर वाद निर्माण होऊन एसटी कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल होण्याच्या भीतीपोटी कर्मचारी खासगी वाहन चालकांच्या तोंडी लागत नसल्याने खासगी वाहने बसस्थानकाच्या अगदी समोर उभी राहत होती. एसटी वाहन चालकांना बसस्थानकातून गाड्या बाहेर काढताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याने भविष्यात अपघात होण्याची शक्यताही आगार व्यवस्थापक डफळे यांनी विशद केली. पोलीस प्रशासनास खासगी प्रवासी वाहनांच्या उपद्रवाविषयी नियमितरीत्या अवगत करण्यात येत असल्याचेही आगार व्यवस्थापकांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.
वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी एसटी गाड्या बसस्थानकातून ज्या मार्गाने जातात, त्या मार्गाचा विस्तार करण्यात येणार आहे. जेणे करुन एसटी गाडयांना वळण घेणे सोयीचे होईल, अशा अपेक्षाही यावेळी आगार व्यवस्थापकांनी व्यक्त केली. यासंदर्भात वरिष्ठांकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे जफळे यांनी सांगितले.
वैध परवाने घेऊन खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना यापुढे बसस्थानक परिसरातील २०० मीटरच्या आत वाहने उभी करण्यात येऊ नये अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, अशी तंबी वाहतूक शाखेतर्फे देण्यात आली. परिणामी बसस्थानकासमोर कोणतेही खासगी वाहन सध्या तरी दिसत नसल्याचे चित्र आहे. स्थानिक पोलीस प्रशासनातर्फे शनिवारी बसस्थानक परिसरात खासगी प्रवासी वाहतुकीच्या गाड्या उभ्या राहणार नाही, यासंदर्भात दक्षता घेण्यात आली होती. जिल्हा वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी सायंकाळपर्यंत चार वाहनचालकांवर कारवाई केली होती.
एसटी बसस्थानक परिसर भविष्यातही खासगी प्रवासी वाहतुकीपासून मुक्त राहतील. जेणे करुन या मार्गावरुन नागरिकांनाही अपघाताच्या भीतीमुक्त वातावरणात ये-जा करणे सोयीचे होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Private vehicle holders shouted!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.