बिल्दोरी पुलाची समस्या मार्गी
By admin | Published: November 21, 2015 12:07 AM2015-11-21T00:07:37+5:302015-11-21T00:07:37+5:30
आॅगस्ट महिन्यात एकाच कुटुंबातील चौघांचा बळी घेणाऱ्या तिवसा तालुक्यातील कौंडण्यपूर नजीकच्या बिल्दोरी पुलाची समस्या आता मार्गी लागली आहे.
विभागीय आयुक्तांनी शब्द पाळला : यशोमती ठाकुरांचाही पाठपुरावा
अमरावती : आॅगस्ट महिन्यात एकाच कुटुंबातील चौघांचा बळी घेणाऱ्या तिवसा तालुक्यातील कौंडण्यपूर नजीकच्या बिल्दोरी पुलाची समस्या आता मार्गी लागली आहे. निविदा प्रक्रियेनंतर शनिवारी या पुलाचे भूमिपूजन होत आहे. विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी तत्काळ निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश सिंचन विभागाला दिले होते. पाटबंधारे विकास महामंडळाद्वारे ६ कोटींचा निधी बांधकाम विभागाकडे हस्तांतरित केला होता.
५ व ६ आॅगस्ट रोजी मुसळधार पावसामुळे बिल्दोरी नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत होते. पुराचा अंदाज न आल्यामुळे ६ आॅगस्टला लग्नसमारंभात सहभागी होण्यासाठी निघालेले यवतमाळ येथील आजनकर परिवारातील चार जण कारसह पुराच्या पाण्यात बुडाल्याने त्यांचा करुण अंत झाला होता. या घटनेची दखल विभागीय आयुक्तांनी घेतली.
७२ मीटर लांबीचा पूल
अमरावती : ज्या पुलावरुन कार पाण्यात कोसळली व बुडाली तो पूल नेहमीच पाण्याखाली असतो. येथे नवीन पूल बांधण्यात यावा, या मागणीसाठी दुर्गवाडा, आलवाडा व धारवाडा येथील ग्रामस्थांनी पाच दिवस पाण्यात राहून आंदोलन केले होते. परंतु त्याला यश मिळाले नव्हते. लोकमतने गावकऱ्यांचा आक्रोश व वेदना लोकदरबारात पोटतिडकीने मांडल्या होत्या. आ. यशोमती ठाकूर, आ.वीरेंद्र जगताप यानी देखील पाठपुरावा केला होता. याची विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर यांनी गांभीर्याने दखल घेतली होती. तत्पूर्वी २ आॅगस्ट रोजी त्यांनी पूलाची पाहणी केली होती व ४ आॅगस्ट रोजी विविध विभागांच्या सचिवांच्या बैठकीत या पुलासाठी निधी देणे का आवश्यक आहे, असे पटवून दिले होते. अखेर या पूलाची समस्या मार्गी लागल्याने दुर्गवाडा- धारवाडा पुनर्वसनाची समस्या निकालात निघणार आहे. बिल्दोरी नाल्यावर बांधण्यात येणारा नवीन पूल ७२ मीटर लांबीचा व साडेसहा मीटर उंचीचा राहणार आहे. निम्न वर्धाच्या बॅकवॉटरपेक्षा दीड मीटर अधिक उंच पूलाचा पृष्ठभाग राहणार आहे.याचा साडेसात कोटींचा निधी बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला.