दर्यापूर शहरात डासांचा उपद्रव वाढला

By admin | Published: April 8, 2015 12:36 AM2015-04-08T00:36:06+5:302015-04-08T00:36:06+5:30

एकीकडे ऊन तापू लागली आहे तर दुसरीकडे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. सकाळी व सायंकाळी प्रत्येक घराघरांत डासांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

The problem of mosquitoes increased in Darayapur city | दर्यापूर शहरात डासांचा उपद्रव वाढला

दर्यापूर शहरात डासांचा उपद्रव वाढला

Next

आरोग्याला धोका : नगरपालिकेकडे फॉगिंग मशीन नाही
संदीप मानकर  दर्यापूर
एकीकडे ऊन तापू लागली आहे तर दुसरीकडे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. सकाळी व सायंकाळी प्रत्येक घराघरांत डासांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून नगरपालिकेकडे फॉगिंग मशीन धुरळणी करण्यासाठी उपलब्ध नसल्यामुळे नाल्यांमध्ये धुरळणी झाली नसल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
सांडपाण्यामुळे डासांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होते. सध्या डेंग्यू सदृष्य तापाची लागण कुणालाही झाली नसल्याचे कळते. परंतु गतवर्षी या तालुक्यात याच आजाराने अनेकांचे बळी गेले होते. दर्यापूर नगर पालिकेकडे २० वार्ड व पाच प्रभाग आहेत. संपूर्ण शहराच्या आरोग्याची जबाबदारी एक आरोग्य निरीक्षक, एक जमादार, नऊ वॉर्ड शिपाई, ४६ सफाई कामगार व ३० कंत्राटी कामगार यांच्या खांद्यावर आहे. परंतु एवढ्या मोठ्या शहरात स्वच्छता करण्यात हा स्टॉप अपुरा पडत असल्याची नेहमीच ओरड होते. नगर पालिकेच्या बैठकीत चार फाँगीग मशीन नव्याने विकत घेण्याचा ठराव यापुर्वीच मांडण्यात आला असून फॉगिंग मशीनसाठी टेंडर प्रोसेसही झाली आहे. नगरपालिकेकडे एक फॉगिंग मशीन उपलब्ध आहे. परंतु ही मशिन अनेक दिवसांपासून नादुरुस्त असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांनाही तारेवरची कसरत करावी लागत आहे. शहरात ट्रॅक्टरच्या सहाय्याने धुरळणी करावी असे आदेश मुख्याधिकारी सुधाकर पानझाडे यांनी आरोग्य निरीक्षक शिवाजी गोमासे यांना दिले आहेत. स्वच्छ व सुंदर दर्यापूर हे नगर पालिकेचे स्वप्न आहे. त्या दृष्टीने २० ही नगरसेवक आपल्या वार्डातल्या समस्या व स्वच्छता यासाठी पुढाकार घेत असतात. त्यांचा नगर पालिकेच्या आरोग्य विभागाकडे तसा पाठपुरावाही असतो. परंतु मार्च एंडिगच्या गडबडीत आरोग्याच्या समस्या संदर्भात दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. शहरात अनधिकृत वराहांचे प्रमाणही वाढले आहे. वराह पकडण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याने या संवेदनशील मुद्याकडे दुर्लक्ष होते. मटण मार्केटसाठी दर्यापूर नगर पालिकेच्या विशेष निधीतून आठवडी बाजारात मार्केट बांधण्यात आले आहे. परंतु हे मार्केट पांढरा हत्ती ठरले असून अद्याप अधिकृतपणे ते सुरु झाले नसल्याचे कळते. त्यामुळे आठवडी बाजारात गेल्या अनेक दिवसांपासून उघडयावरच मांस विक्री सुरु केली आहे. त्यामुळे परिसरातल्या नागरिकांना यासंदर्भाचा त्रास सहन करावा लागतो. या मार्गाने विद्यार्थ्यांची नेहमीच ये-जा असते. त्यामुळे त्यांच्या मनावर उघड्यावर मांस विक्रीचा परिणाम होतो.
नगरपालिकेने यासंदर्भाची अनेकवेळा धडक मोहीम राबवून कारवाईसुध्दा केली. परंतु कारवाईला न जुमानता पुन्हा उघड्यावर मांस विक्री सुरु झाली आहे. शहरात नगर पालीकेच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीतून मुख्य रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम झपाट्याने सुरु आहे. या कामाचे नागरिकांनी कौतुक केले आहे. रस्ता दुभाजकाचेसुध्दा सौंदर्यीकरण करण्यात यावे अशी मागणी होत आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांना ट्रॅक्टरच्या साहाय्याने डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धुरळणी करण्यासाठी सांगितले आहे. प्रत्येकच वार्डात ही मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी केमिकलसुध्दा मागविण्यात आले असून आपण स्वत: जातीने लक्ष देऊन हे काम पूर्ण करुन घेऊ
शिवाजी गोमासे,
आरोग्य निरीक्षक दर्यापूर

Web Title: The problem of mosquitoes increased in Darayapur city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.