न्यायाधीशांनी जाणून घेतल्या बंद्यांच्या समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2016 12:39 AM2016-01-21T00:39:59+5:302016-01-21T00:40:39+5:30
येथील मध्यवर्ती कारागृहात रविवारी पार पडलेल्या लोक अदालत कार्यक्रमातून न्यायाधीशांनी बंदीजनांच्या समस्या जाणून घेतल्या.
लोकअदालत : कारागृहातील तक्रारपेट्यांची तपासणी
अमरावती : येथील मध्यवर्ती कारागृहात रविवारी पार पडलेल्या लोक अदालत कार्यक्रमातून न्यायाधीशांनी बंदीजनांच्या समस्या जाणून घेतल्या. दरम्यान, कारागृहातील तक्रारपेट्यांची तपासणी करून बंदीजनांच्या व्यथांची दखल न्यायाधीशांनी घेतली. यावेळी न्यायाधीशांनी कैद्यांना त्यांचे अधिकार, कर्तव्य सांगितले.
कारागृहात संत गाडगेबाबा प्रार्थना सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एम. ढवळे होते. प्रमुख अतिथी म्हणून तिसरे सहदिवाणी न्यायाधीश व स्तर ए.ए. कोठारी, न्यायमूर्ती एस.एस. दास, न्यायमूर्ती चव्हाण, न्यायमूर्ती एस.आर वानखेडे, न्यायमूर्ती ओझा, न्यायमूर्ती शिलार, न्यायमूर्ती पाटील, न्यायमूर्ती मोरे, न्यायमूर्ती मैनुना, न्यायमूर्ती बनसोड, न्यायमूर्ती गुलाटी, न्यायमूर्ती सोनुने, कारागृह अधीक्षक एस.व्ही. खटावकर, वरिष्ठ तुरुंगाधिकारी ए.ए. पिल्लेवान आदी उपस्थित होते. दरम्यान न्यायमूर्ती ढवळे यांनी उपस्थित बंदीजनांशी संवाद साधताना न्यायालयीन प्रक्रियेची माहिती दिली. विविध गुन्ह्याच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेल्या बंदीजनांंना न्यायाधीशाकडून बऱ्याच अपेक्षा असतात. मात्र, कायदेशीर बाबी तपासूनच बंदीबांधवांना त्यांचे अधिकार प्रदान केले जातात, असे त्यांनी स्पष्ट केले. लोकअदालत हा उपक्रम प्रलंबित प्रकरणांना निकाली काढणे हा होय. यावेळी न्या. ढवळे यांनी लोक अदालतीमध्ये बंदीजनांचे दोन प्रकरण हाताळले. त्यांच्याशी संवाद साधताना त्यांचे प्रश्न, समस्या देखील जाणून घेतल्या.
उपक्रमाबाबत प्रशंसा
अमरावती : यावेळी कारागृहातील ग्रंथालय, विपश्यना हॉल, कैद्यांना मिळणारे जेवण, आरोग्य, शिक्षण, योगा आदींची माहिती न्यायमूर्र्तींनी घेतली. बंद्यांची न्यायालयीन प्रकरणे त्वरेने निपटारा करण्यासाठी कारागृह प्रशासनाने पुढाकार घ्यावा, असे न्या.ढवळे यांनी सांगितले. कारागृह प्रशासनच्यावतीने बंद्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांबाबत न्यायमूर्तींनी अधिकाऱ्यांची प्रशंसा केली. कारागृहाची अंतर्गत व बाह्य सुरक्षेचा आढावा घेताना न्यायमूर्तींनी ‘ओके’ केले. यावेळी न्यायालयाचे कार्यालयीन अधीक्षक फुकटे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी नितीन क्षीरसागर, पालीवाल, खुशबू महात्मे, निलेश निमकर, कांबळे गुरुजी आदी उपस्थित होते.