वन्यप्रेमींच्या विरोधामुळे उद्यान रद्द करण्याची प्रक्रिया सुरू ?
By Admin | Published: June 6, 2016 12:10 AM2016-06-06T00:10:46+5:302016-06-06T00:10:46+5:30
छत्री तलावलगत निर्माणधिन उद्यानाला नागरिकांनी विरोध दर्शविल्यामुळे उद्यानाचे काम बंद करून उद्यान रद्द करण्यासंदर्भात प्रक्रिया सुरु करा,...
देशमुखांची अधिकाऱ्यांना सूचना : उद्यान हटविण्याचा मुद्दा
अमरावती : छत्री तलावलगत निर्माणधिन उद्यानाला नागरिकांनी विरोध दर्शविल्यामुळे उद्यानाचे काम बंद करून उद्यान रद्द करण्यासंदर्भात प्रक्रिया सुरु करा, अशा सूचना रविवारी आ. सुनील देशमुख यांनी उद्यानाच्या पाहणी दरम्यान सामाजिक वनिकरण व वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. त्यामुळे वन्यप्रेमींमध्ये आनंद व्यक्त होत आहे.
स्व. उत्तमराव पाटील उद्यानासभोवताल असणाऱ्या तारेच्या कुंपणामुळे वन्यजीवांना छत्री तलावावर पाणी पिण्यासाठी जात येत नाही. त्यामुळे उद्यानाचे कुंपण काढण्यात यावे, अशी मागणी करून पोहरा बजाव समितीचे तसेच वन्यप्रेमी नीलेश कंचनपुरे, उज्ज्वल थोरात, धनंजय पळसकर यांच्यासह शेकडो वन्यप्रेमींनी या उद्यानाला विरोध दर्शविला. मात्र, त्यासंदर्भात सामाजिक वनीकरणाने कोणतीही कारवाई केली नाही. दरम्यानच उद्यानाच्या कुंपणामुळे दोन ते तीन दिवसात एक हरिण व एका निलगाईचा मृत्यू झाला तर चार ते पाच वन्यप्राणी जखमीसुध्दा झाले.
सामाजिक वनीकरणाच्या हालचाली सुरू
अमरावती : ही बाब छत्री तलाव मार्गाने मार्नीग वॉक करीता जाणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आली. त्यांनीही वन्यजीवाना वाचविण्यासाठी पुढाकार घेऊन उद्यानाला विरोध दर्शविला. यासंदर्भात रविवारी आ. सुनील देशमुख यांनी उद्यानाच्या कार्याची पाहणी केली. यावेळी सामाजिक वनिकरणाचे उपसंचालक मसराम, उपवनसरंक्षक नीनू सोमराज, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर व वन्यप्रेमी उपस्थित होते. यावेळी वन्यप्रेमी व नागरिकांनी उद्यानाच्या विरोधात बाजू मांडून वन्यप्राण्याबद्दल सहानुभूती दाखविली. तर शासनाचा उपक्रम असल्याचे सांगून अधिकाऱ्यांनी हात झटकले होते. मात्र, आ. देशमुखांनी दोन्ही बाजू ऐकून नागरिकांच्या समर्थनात बाजू मांडत उद्यानाच्या काम बंद करण्याची प्रकिया करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्यात. या जागेवरून उद्यान न हटविल्यास आंदोलन छेडू, असा इशारा वन्यप्रेंमीसह नागरिकांनी दिला आहे. आता त्या दिशेने सामाजिक वनिकरण व वनविभागाने हालचाली सुरु केले आहे. याबाबत पालकमंत्री प्रवीण पोटे यांना निवेदन देण्यात आले आहे.
उद्यानाला शासनाची मंजूर असून हे उद्यान नागरिकांसाठी सुविधाजनक राहणार आहे. मात्र, नागरिकांनी विरोध दर्शविल्याने पर्यायी मार्ग काढण्यासंदर्भात सामाजिक वनिकरणाचे अधिकारी वरिष्ठांशी चर्चा करणार आहे.
- नीनू सोमराज,
उपवनसंरक्षक, वनविभाग.
शासनाच्या आदेशाने आम्ही उद्यान निर्मिती करीत आहेत. मात्र, जर नागरिकांचा विरोध असेल तर आम्ही वरिष्ठांशी चर्चा करून पुढील निती ठरवू.
- प्रदीप मसराम,
उपसंचालक, सामाजिक वनिकरण.