अमरावती विद्यापीठाच्या नव्या कुुलगुरू निवडीची प्रक्रिया रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:11 AM2021-05-17T04:11:11+5:302021-05-17T04:11:11+5:30
कोरोनाचा परिणाम, विद्यमान कुलगुरूंचा कार्यकाळ २ जूनला येणार संपुष्टात अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू मुरलीधर चांदेकर ...
कोरोनाचा परिणाम, विद्यमान कुलगुरूंचा कार्यकाळ २ जूनला येणार संपुष्टात
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांचा कार्यकाळ २ जून २०२१ रोजी संपुष्टात येत आहे. मात्र, आता अवघे १५ दिवस शिल्लक असताना कोरोना संसर्गामुळे राजभवनातून नव्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया रखडल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्यपाल कार्यालयातून यासंदर्भात हालचाली केव्हा सुरू होणार, याकडे शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांच्या नजरा खिळल्या आहेत.
नव्या कुलगुरू निवडीसाठी राज्यपालांकडून समिती गठित होणे आवश्यक आहे. त्याशिवाय कुलगुरू निवडीची प्रक्रिया पुढे सरकत नाही. अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुंचा कार्यकाळ संपुष्टात येण्यास १५ दिवस असतानासुद्धा राजभवनातून ना समिती गठित, ना कुलगुरूपदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. त्यामुळे उच्च शिक्षण क्षेत्रातील कुलगुरूपदासाठी पात्र अनेक नामवंतांना कुलगुरूपदाचे वेध लागले आहे. अमरावती विद्यापीठात फेब्रुवारी महिन्यात नवीन कुलगुरू निवड समितीचे सदस्यपदासाठी व्यवस्थापन परिषद, विद्धत परिषद यांची संयुक्त बैठक पार पडली. यात दिल्ली येथील बीएचयू आयआयटीचे संचालक संजीवकुमार जैन यांची सदस्य म्हणून निवड करून तसे पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अवलोकनार्थ पाठविण्यात आले. परंतु, राज्यपालनामित समितीचे अध्यक्ष, सचिवांची अद्यापही निवड झालेली नाही. आता उणेपुरे १५ दिवस असताना कोरोना संसर्गाचा वाढता वेग बघता राजभवनातून अमरावती विद्यापीठाच्या नवीन कुलगुरूंची निवड प्रक्रिया कधी वेग घेते, याकडे लक्ष लागले आहे. कुलगुरू निवड समितीचे अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश अथवा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असणे अपेक्षित आहे. तसेच सचिवपदी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव यांची निवड होत असते. मात्र, राजभवनातही कोरोना शिरल्याने नवीन कुलगुरू निवड समिती स्थापनेकडे लक्ष लागले आहे.
----------------------
कुलगुरु मुरलीधर चांदेकर यांना बढतीचे संकेत
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी केंद्र सरकारमध्ये चांगली पकड निर्माण केली आहे. चांदेकर हे सध्या यूजीसीच्या महाविद्यालयीन अनुदान समितीवर कार्यरत आहेत. बंगळुरू येथील नॅक समितीवर आहेत. त्यामुळे कुलगुरू चांदेकर यांना अमरावती येथून थेट दिल्लीच्या केंद्रीय अनुदान आयोगात वर्णी लागेल, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. यूजीसीत मोठ्या पदावर विराजमान होण्यासाठी कुलगुरू चांदेकर यांनी अर्जदेखील सादर केल्याची माहिती आहे.