जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यात सेंद्रिय खताची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 11:21 PM2018-03-14T23:21:48+5:302018-03-14T23:21:48+5:30
शासकीय निवासस्थान आवारातील झाडांचा पालापाचोळा, कचरा आदी गोळा करून प्रक्रियेद्वारे सेंद्रिय खताची निर्मिती करणे,...
आॅनलाईन लोकमत
अमरावती : शासकीय निवासस्थान आवारातील झाडांचा पालापाचोळा, कचरा आदी गोळा करून प्रक्रियेद्वारे सेंद्रिय खताची निर्मिती करणे, पुढे हेच खत परसबागेत वापरून परिवारासाठी विषमुक्त भाजीपाला आणि फळांचे उत्पादन घेणे ही अभिनव संकल्पना जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी निवासस्थानी राबविली आहे. या संकल्पनेद्वारे शासकीय कार्यालये, अधिकाऱ्यांच्या निवासस्थानासाठी हा आदर्श पाठ ठरणार आहे.
लोकाभिमुख प्रशासन आणि जनसामान्यांना सदैव उपलब्ध असणाऱ्या जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांची कार्यतत्परतेमुळे जिल्ह्यात एक वेगळी छबी निर्माण झालेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे शासकीय निवासस्थान हा विस्तीर्ण परिसर असून, येथे विविध प्रकारची फळे व फुलझाडांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. झाडांची संगोपन आणि संर्वधनासाठी दोन माळी नियुक्त केले आहेत. येथे दररोज मोठ्या प्रमाणात पालापाचोळा गोळा होतो. हा कचरा पेटविला गेल्यास त्याच्या धुरामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषणाने पर्यावरणाला हानी पोहोचते. हे सर्व टाळून कचऱ्यावर प्रक्रिया करून सेंद्रिय खताची निर्मिती व त्याचा परसबागेतच वापर हे दिशादर्शक ठरणारे आहे.
हा तर शासकीय निवासस्थानांसाठी आदर्शपाठ
बहुतांश शासकीय कार्यालये व अधिकाऱ्यांच्या निवासस्थानात दररोज कचरा पेटविला जात असल्याचे बोलके छायाचित्र ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी याउलट स्थिती आहे. येथे कचऱ्यावर प्रक्रियाद्वारा सेंद्रिय खतनिर्मिती केली जाते.
सेंद्रिय खतनिर्मितीचे टाके थोडे शिकस्त झाल्याने दुरुस्त करण्यात आले. याच टाक्यात आवारातील झाडांचा कचरा टाकला जाऊन सेंद्रिय खत तयार केले जाते व याचा वापर परसबागेतच करण्यात येत आहे.
- अभिजित बांगर, जिल्हाधिकारी