अमरावती जिल्ह्यात युरोपीय निकषांप्रमाणे विषमुक्त डाळिंबाचे उत्पादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 02:44 PM2018-09-01T14:44:20+5:302018-09-01T14:48:10+5:30
तिवसा तालुक्यातील कुºहा या गावाचे युवा शेतकरी सचिन देशमुख यांनी आपल्या शेतात सलग दुसऱ्या वर्षी विषमुक्त (रेसिड्यू फ्री) डाळिंबाचे उत्पादन घेतले आहे. ही फळे युरोपीय निकष (नॉर्म्स) नुसार असल्याचा अहवाल नागपूर येथील प्रयोगशाळेने दिला आहे.
रितेश नारळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : तिवसा तालुक्यातील कुऱ्हा या गावाचे युवा शेतकरी सचिन देशमुख यांनी आपल्या शेतात सलग दुसऱ्या वर्षी विषमुक्त (रेसिड्यू फ्री) डाळिंबाचे उत्पादन घेतले आहे. ही फळे युरोपीय निकष (नॉर्म्स) नुसार असल्याचा अहवाल नागपूर येथील प्रयोगशाळेने दिला आहे.
सचिन देशमुख यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर २५ वर्षे मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी केली. भरपूर वेळ विदेशवारीत गेला. पण, ठरावीक वयानंतर शेती करायची, हा त्यांचा निश्चय होता. यामुळे गलेलठ्ठ पगाराची नोकरीला सोडून जन्मगावी शेती करण्यास आले. त्यांनी २०१४ साली घरच्या तीन एकर शेतात दोन हजार डाळिंबाची झाडे लावली. २०१७ ला पहिल्याच प्रयत्नात युरोपीय नियमानुसार फळे मिळवण्यात ते यशस्वी ठरले. अशा विषमुक्त फळांना युरोपीय बाजारपेठांमध्ये मागणी राहते.
विदेशात रसायनयुक्त शेतीला थारा नसल्याचे निरीक्षण सचिन देशमुख यांनी युरोपीय वास्तव्यात नोंदवले होते. त्यामुळे स्थानिकांना अशी फळे उपलब्ध करण्याचे ध्येय त्यांनी निश्चित केले. यंदा २०१८ मध्ये एक हजार झाडांवर फळे घेतली आणि ती प्रयोगशाळेने रेसिड्यू फ्री असल्याचे अहवाल दिला आहे. त्यांना नाशिक येथील डाळिंब उत्पादक व अभ्यासक बाळासाहेब म्हैसकर मार्गदर्शन करतात. यावर्षी हजार झाडांवर तीन लाखांचा खर्च झाला असून, सात लाखांचे उत्पादन मिळण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
शेतकरी ते ग्राहक थेट विक्री
डाळिंबाचे उत्पादन व्यापाऱ्यांला न विकता सचिन देशमुख हे स्वत: मार्केटिंग करतात. त्यांच्याशी संपर्क करून हवी तेवढी फळे होम डिलिव्हरीने मागवता येतात. त्यांच्या या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अमरावती, नागपूर, पुणे, मुंबई, दिल्ली, बंगळूर आदी शहरांमध्ये त्यांनी डाळिंब कुरियर केले आहेत. काही मेट्रो शहरांत सेंद्रिय फळ, भाजी मॉलसोबत बोलणी झाली असून, तेथेही माल पाठवित आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा विक्रीसाठी वापर
व्हॉट्स अॅप, फेसबूक, इन्स्टाग्राम आदी साधनांचा वापर विक्रीसाठी केला जातो. दिवसेन्दिवस त्यांच्याकडील सेंद्रिय डाळिंबाची मागणी वाढत चालली आहे. डाळिंब तोडणे, पॅकिंग यामधून चार कामगारांना कायमस्वरूपी रोजगार दिला आहे.