कौशल्य विकासावर आधारित मनुष्यबळ निर्मितीमुळे देशाची प्रगती
By admin | Published: April 12, 2015 12:33 AM2015-04-12T00:33:52+5:302015-04-12T00:33:52+5:30
भारत आज जगामध्ये सर्वात तरुण असलेला देश आहे. ..
सिपना अभियांत्रिकीत परिसंवाद : मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन
अमरावती : भारत आज जगामध्ये सर्वात तरुण असलेला देश आहे. जगाचे सरासरी आयुर्मान वृद्धत्वाकडे झुकत असताना आपल्या देशात मात्र ते तरूण होत आहे. या तरूण पिढीची कौशल्य विकासावर आधारित मनुष्यबळ निर्मिती करणे गरजेचे आहे. त्यामुळे देशाची प्रगती वेगाने होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केले.
येथील सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कै. अरविंद ऊर्फ भाऊ अनंत लिमये सभागृहात ‘तंत्रज्ञानाच्या कौशल्य विकासावर होणारा परिणाम’ या विषयावर दोन दिवसीय ४६ व्या मिड टर्म परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. या परिसंवादाचे उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी व्यासपीठावर दि इन्स्टीट्यूट आॅफ इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर्सच्या अध्यक्ष स्मृती डागर, टीपीपीसीचे अध्यक्ष एम. एच. कोरी, जे. डब्ल्यू. बाकल, पी. के. जागिया, अजय ठाकरे, एस. ए. लढके आदी उपस्थित होते. तसेच कार्यक्रमस्थळी पालकमंत्री प्रवीण पोटे, माजी मंत्री जगदीश गुप्ता, खासदार आनंदराव अडसूळ, आमदार अनिल बोंडे, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते आदी उपस्थित होते.
जगामध्ये आपल्या देशात तरुणांची असलेली सर्वात जास्त संख्या ही एक संधी असून या संधीचे रुपांतर देशापुढील आव्हाने यशस्वीपणे पेलण्यासाठी करावे, असे आवाहन करीत मुख्यमंत्री म्हणाले, समाजातील बहुतांश टक्का आज कार्यरत असणाऱ्या वयोगटात मोडतो. या गटाचे कौशल्य विकासावर आधारित मनुष्यबळ निर्मितीमध्ये रुपांतर केल्यास आपला देश विकसित होण्यास विलंब लागणार नाही. या कौशल्य विकासासाठी उच्च शिक्षणाची आवश्यकता आहे. तरूण लोकसंख्येला पुरेल एवढ्या उच्च शिक्षणाची व्यवस्था आपणाकडे असली पाहिजे, तरच कौशल्य विकासावर आधारित मनुष्यबळ निर्माण होऊ शकेल. ही लोकसंख्या रोजगारक्षम असणार आहे, असेही मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाच्या वेळी स्मृती डागर यांनी भाषणातून आय. ई. टी. ई. या संस्थेच्या कार्याचा मागोवा घेतला. तसेच कोरी, लढके यांनीही याप्रसंगी आपले विचार मांडले. प्रास्ताविक अजय ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाची सुरूवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. संचालन डिखू खालसा व राखी गुप्ता यांनी तर आभार प्रदर्शन जे. डब्ल्यू. बाकल यांनी केले.
युवकांनो, देशसेवेसाठी पुढे या...
केवळ पुस्तकी ज्ञान घेऊन जीवनाचे सार्थक होत नाही. कौशल्य विकासावर आधारित ज्ञान घेऊन युवकांनी देशसेवेसाठी पुढे यावे, असे भावनिक आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.