पोषण आहार देण्यावर दर्यापुरात बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 11:00 PM2017-08-25T23:00:56+5:302017-08-25T23:01:33+5:30
तालुक्यातील सांगळूद येथे पोषण आहाराच्या पाकिटांमध्ये बुरशी लागल्याचे उघडकीस आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
दर्यापूर : तालुक्यातील सांगळूद येथे पोषण आहाराच्या पाकिटांमध्ये बुरशी लागल्याचे उघडकीस आले आहे. यानंतर तालुक्यातील सर्व २०४ अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार देण्यावर महिला व बाल कल्याण विस्तार अधिकारी व बाल विकास प्रकल्प अधिकाºयांनी बंदी घातली असून पुढील सूचनेपर्यंत पोषण आहार देऊ नये, अशा सूचना आहेत.
गुरुवारी तालुक्यातील सांगळूद येथे शासकीय पोषण आहाराला बुरशी लागल्याचे आढळून आले होते. विशेष म्हणजे बंद पाकिट फोडल्यानंतर बुरशी असल्याचे उघड झाले होते. यामुळे तालुक्यात सर्वत्र खळबळ माजली होती. हे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच पोषण आहाराचे वाटप थांबविण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या. शुक्रवारी अमरावती येथील महिला व बाल कल्याण विभागाचे विस्तार अधिकारी संजय खारकर व बाल विकास प्रकल्प अधिकारी मीना देशमुख यांनी सांगळूद येथे भेट दिली. गावकºयांच्या उपस्थितीत पोषण आहाराची तपासणी करण्यात आली. जे पोषण आहाराचे पाकिटे खराब झाली व त्याला बुरशी लागली ते जप्त करण्यात आले. चौकशी व तपासणीसाठी विभागीय आयुक्तांकडे पाठविली आहे. तुर्तास तालुक्यातील सर्व २०४ अंगणवाडीत शासनाच्यावतीने पुरवठा करण्यात आलेला पोषण आहार मुलांना देण्यात येऊ नये, अशा सूचना अहेत. तसेच या संदर्भात तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविकांची बैठक सोमवारी आयोजित करण्यात आल्याची माहिती मीना देशमुख यांनी ‘लोकमत’ला दिली.