बंधने झुगारून स्त्रियांनी व्यक्त व्हावे
By admin | Published: March 3, 2016 12:28 AM2016-03-03T00:28:51+5:302016-03-03T00:28:51+5:30
महिलांनी कौटुंबिक आणि सामाजिक दडपणांमध्ये अडकून न राहता ही बंधने झुगारून मोकळेपणाने लिखाण करावे,
अनुराधा वऱ्हाडे यांचे प्रतिपादन : विदर्भस्तरीय लिहित्या स्त्रियांची कार्यशाळा
अमरावती : महिलांनी कौटुंबिक आणि सामाजिक दडपणांमध्ये अडकून न राहता ही बंधने झुगारून मोकळेपणाने लिखाण करावे, लिहिणाऱ्या स्त्रियांचे लिखाण प्रसिध्द होत नसले तरी ते मौलिक असते. त्यामुळे महिलांनी दडपण झुगारून लिखाण करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन अनुराधा वऱ्हाडे यांनी केले.
नागपूर येथील माहेर संस्थेद्वारा प्रकाशित आकांक्षा मासिक, विदर्भ गौरव प्रतिष्ठान, श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने श्री हव्याप्र मंडळात आयोजित दोन दिवसीय विदर्भस्तरीय लिहित्या स्त्रियांच्या कार्यशाळेत उदघाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर उद्घाटक म्हणून यशवंत मनोहर, स्त्रीवादी लेखिका प्रज्ञा दया पवार, साहित्यिक प्रभा गणोरकर, रमेश अंधारे, माधुरी चेंडके, आयोजक अरूणा सबाने आदींची उपस्थिती होती. आई, सासू आणि आजे सासूच्या व्यक्त होण्याच्या गुणाचा पुढील आयुष्यात कसा वापर करून घेतला, हे देखील प्रज्ञा पवार यांनी सुसूत्र पध्दतीने विषद केले.
उद्घाटनपर भाषणात यशवंत मनोहर यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. ते म्हणाले, धर्म जेव्हा अतिशय उन्मादी रूप धारण करतो त्याचे सर्वाधिक परिणाम महिलांनाच भोगावे लागतात. स्त्रियांना मन, भावना आणि अनुुभव अव्यक्त असते. भारतीय संस्कृती ही पिता आणि पती अशी पुरूषप्रधान आहे. त्यामुळेच महिलांच्या लिखाणालादेखील पाहिजे तसा वाव मिळत नाही. म्हणून महिलांनी यातून मार्ग काढून लिखाणाला प्राधान्य दिले पाहिजे. आत्मबळ हेच स्त्रीचे शस्त्र आहे. अशा कार्यशाळा या महिलांसाठी प्रेरक ठरत आहेत, या शब्दांत त्यांनी आयोजक अरूणा सबाने यांच्या कार्याचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात रमेश अंधारे यांच्या अध्यक्षतेखाली रमेश इंगळे उत्रादकर, अलका गायकवाड, शोभा रोकडे, छाया कावळे, जयश्री सातोकर यांनी सहभाग नोंदविला. यामध्ये ‘कादंबरी’ या विषयावर विस्तृत चर्चा करण्यात आली. शोभा रोकडे यांनी महिलांना मुक्त मानसिकतेने स्वानुभवांचे लिखाण करण्याचे आवाहन केले.
तिसऱ्या सत्रात ‘साहित्य आणि समाज’ या विषयावर नयना धवड यांच्या अध्यक्षतेखाली राजेंद्र मुंढे, विजया ब्राह्मणकर, संध्या पवार, आशा वाडिखाये यांनी चर्चा केली. साहित्य क्षेत्रातही पुरूषांचेच वर्चस्व आहे. महिलांच्या साहित्याची विशेष दखल घेतली जात नाही. त्यासाठी महिलांनीच आत्मबळ वाढविण्याची गरज आहे, असे मत या सत्रात सहभागी मान्यवरांनी व्यक्त केले.
मुलाखतीचे चौथे सत्र दुपारी ३.३० वाजता आयोजित करण्यात आले होते. यामध्ये अनिल नितनवरे यांनी प्रज्ञा दया पवार यांची मुलाखत घेतली. प्रज्ञा पवार यांनी त्यांच्या जीवनातील विविध अनुभव कथन केले. पाचव्या सत्रात कवी संमेलन पार पडले. रेषा आकोटकर अध्यक्षस्थानी होत्या. तर संध्या सराडकर, मयुरा देशमुख, पद्मरेखा वानखेडे, शशी डंभारे, स्मिता गालफाडे, सुजाता लोखंडे, बबन सराडकर आदींनी कविता सादर केल्यात.