एसटीमधून बेवारस पार्सल नेण्यास बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 10:19 PM2019-03-06T22:19:29+5:302019-03-06T22:19:49+5:30
दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्र्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या येथील विभागीय कार्यालयानेही हाय अर्लट जारी केला आहे. वाहक व चालकांना कोणतेही बेवारस पार्सल नेण्यास बंदी घातली आहे. रीतसर प्रक्रिया केलेले पार्सल अधिकृत हमालांच्या माध्यमातून किंवा प्रवास करणाऱ्या व्यक्तीने बसमध्ये ठेवलेले असणे अनिवार्य करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्र्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या येथील विभागीय कार्यालयानेही हाय अर्लट जारी केला आहे. वाहक व चालकांना कोणतेही बेवारस पार्सल नेण्यास बंदी घातली आहे. रीतसर प्रक्रिया केलेले पार्सल अधिकृत हमालांच्या माध्यमातून किंवा प्रवास करणाऱ्या व्यक्तीने बसमध्ये ठेवलेले असणे अनिवार्य करण्यात आले आहे.
बसमधील वाहक व चालक थोड्याशा चिरीमिरीसाठी कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून पार्सल घेतात. नंतर पुढे ठरलेल्या ठिकाणी पार्सल अनोळखी व्यक्तीकडे दिले जाते. यातून अंतर व पार्सलच्या आकारमानानुसार चालक वा वाहक संबंधित व्यक्तीकडून पैसे घेतात. रोज या प्रकारातून हजारो रुपयांची उलाढाल होते. हा पैसा महामंडळाला न मिळता ते थेट वाहन चालकाच्या खिशात जात आहे. यापूर्वी बसमध्ये जिलेटीनच्या कांड्या आढळल्याचा प्रकार उघडकीस आला. यामुळे परिवहन महामंडळाने हाय अलर्ट जारी केला आहे. प्रत्येक वाहक व चालकाला तसेच आगारप्रमुखाला असे पार्सल सक्त बंदी घातली आहे. अधिकृत नोंदणी करून किंवा सोबत व्यक्ती असलेलेच पार्सल बसमध्ये घेण्याबाबत बजावण्यात आले आहे. पार्सलच्या माध्यमातून विस्फोटक वस्तू देण्याची शक्यता नाकारता येत नाही. यातून प्रवाशांच्या जिवाला धोका होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात बळावली आहे. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाकडून ही दक्षता घेण्यात आली आहे.
-तर वाहनचालकावर कारवाई
चालक-वाहकांनी बेवारस पार्सल घेतलेले आढळल्यास थेट निलंबन व दंडाची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तपासणी पथकांना तिकीटसोबतच संपूर्ण बसमधील लगेजची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच आगार व्यवस्थापकांनाही यासंदर्भात दक्षता घेण्याबाबत बजावण्यात आले आहे. यामुळे यापुढे वाहकांना पार्सल नेता येणार नाही, हे विशेष.
दहशतवादी हल्ल्याच्याच पार्श्वभूमीवर नव्ह ेसातत्याने या आदेशाचे पालन करण्याबाबत सर्वांना बजावण्यात आले आहे. बसमध्ये कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी ही खबरदारी व दक्षता घेण्यात आली आहे.
- श्रीकांत गभणे,
विभागीय नियंत्रक