कोविडमुळे अनाथ बालकांचे तीन वर्षांचे शैक्षणिक शुल्क ‘प्रोजेक्ट मुंबई’ भरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2021 05:00 AM2021-11-10T05:00:00+5:302021-11-10T05:00:56+5:30
कोविड-१९ मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांचे संरक्षण आणि संगोपनाची जबाबदारी पालकत्वाच्या नात्याने राज्य शासन समर्थपणे बजावत आहे. या बालकांना शैक्षणिक, व्यावसायिक प्रशिक्षणाच्या आदी सुविधा उपलब्ध करून त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. अशातच त्यांचे शिक्षण, मानसिक पुनर्वसनासाठी सामाजिक जबाबदारी म्हणून स्वयंसेवी संस्था पुढे येत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोविडमुळे अनाथ झालेल्या मुलांच्या शालेय शुल्काची जबाबदारी आणि मुलांच्या समुपदेशनाची मोहीम स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून शासनाने हाती घेतली आहे. प्रोजेक्ट मुंबई या संस्थेने शिक्षण शुल्काची जबाबदारी घेतली. जिल्ह्यातील ३७ बालकांचे शैक्षणिक शुल्क या संस्थेने अदा केले आहे. अनाथ बालकांच्या मदतीसाठी प्रोजेक्ट मुंबई तसेच इंडियन सायकियाट्रिक सोसायटी या संस्थांसोबत सामंजस्य करार करण्यात आले असून या मुलांना शैक्षणिक साधनेही पुरविण्यात येणार आहेत, असे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सोमवारी येथे सांगितले.
कोविड-१९ मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांचे संरक्षण आणि संगोपनाची जबाबदारी पालकत्वाच्या नात्याने राज्य शासन समर्थपणे बजावत आहे. या बालकांना शैक्षणिक, व्यावसायिक प्रशिक्षणाच्या आदी सुविधा उपलब्ध करून त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. अशातच त्यांचे शिक्षण, मानसिक पुनर्वसनासाठी सामाजिक जबाबदारी म्हणून स्वयंसेवी संस्था पुढे येत आहेत. प्रोजेक्ट इंडिया व इंडियन सायकियाट्रिक सोसायटीसमवेत सामंजस्य करार करण्यात आला असून, प्रोजेक्ट मुंबई संस्थेद्वारे कोरोना कालावधीत दोन्ही पालक गमावलेल्या राज्यातील बालकांचे पुढील तीन वर्षाचे शैक्षणिक शुल्क बालकांच्या नावे थेट शैक्षणिक संस्थेत जमा करण्यात येईल. त्यानुसार यंदाचे शुल्क जमा झाले आहे. शिक्षणासाठी आवश्यकतेप्रमाणे ॲण्ड्रॉईड मोबाईल, लॅपटॉप, सायकल आदी बाबी पुरवण्यात येणार आहेत
पहिल्या टप्प्यात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना मदत पुरवण्यात येणार असून दुसऱ्या टप्प्यात एक पालक गमावलेल्या बालकांनाही मदत देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. संस्थेने १८००, १०२, ४०४० हा समर्पित टोल फ्री क्रमांक सुरू केला असून संकटग्रस्त बालकांनी मदतीसाठी यावर संपर्क साधल्यास त्यांना तातडीने मदत पुरवण्यात येणार आहे, अशी माहिती प्रोजेक्ट इंडियाचे शिशिर जोशी यांनी सांगितले.
समुपदेशनासाठी सहकार्य
बालकांच्या समुपदेशनासाठी इंडियन सायकियाट्रिक सोसायटीचे सहकार्य मिळाले आहे. पालक गमावलेल्या बालकांवर मोठा आघात झालेला असतो. त्यांचे मानसिक पुनर्वसन करणे आव्हानात्मक असून त्यासाठी या बालकांशी योग्य पद्धतीने संवाद साधण्याचे प्रशिक्षण इंडियन सायकियाट्रिक सोसायटीशी संलग्न मानसोपचार तज्ज्ञ हे महिला व बालविकास विभागाचे जिल्हास्तरीय समुपदेशकांना देत आहेत. या बालकांचे शैक्षणिक, सामाजिक, मानसिक पुनर्वसन आणि शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने एकात्मिक पद्धतीने काम संस्थेमार्फत करण्यात येत आहे.