राज्यात बोगस पशुवैद्यकीय डॉक्टरांचा सुळसुळाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:11 AM2021-07-11T04:11:04+5:302021-07-11T04:11:04+5:30
अनिल कडू परतवाडा : राज्यात बोगस पशुवैद्यकीय डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे. अशा बोगस डॉक्टरांना शोधून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश ...
अनिल कडू
परतवाडा : राज्यात बोगस पशुवैद्यकीय डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे. अशा बोगस डॉक्टरांना शोधून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य पशुवैद्यक परिषदेने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांना दिले आहेत.
महाराष्ट्र राज्य पशुवैद्यक परिषद, नागपूरचे निबंधक बी.आर. रामटेके यांनी या अनुषंगाने ९ जुलैला आदेश निर्गमित केले. या बोगस डॉक्टरांकडे पशुवैद्यकीय क्षेत्रातील बी.व्ही.एस्सी. पदवी नाही. व्हेटरनरी कौन्सिलकडे नोंदणी नाही. बोगस प्रमाणपत्रावर पात्रता नसतानाही ते डॉक्टर या उपाधीचा हेतुपुरस्सर गैरवापर करीत आहेत. पशुवैद्यकशास्त्राचे ज्ञान प्राप्त न करता मुक्या प्राण्यांच्या जिवाशी ते खेळ करीत आहेत. व्हेटरनरी कौन्सिल ऑफ इंडिया यांच्या मार्गदर्शक तत्त्व व निर्देशानुसार, व्हेटरनरी मेडिसिन प्रॅक्टिस करण्याकरिता, महाराष्ट्र व्हेटरनरी कौन्सिलकडे नोंदणी करणे अत्यावश्यक आहे. नोंदणीकृत डॉक्टरांनाच राज्यात व्हेटरनरी मेडिसिनची प्रॅक्टिस करण्याची मुभा आहे. अनोंदणीकृत व्यक्तींना ही प्रॅक्टिस करता येत नाही. नोंदणी व आवश्यक शैक्षणिक पात्रता नसलेल्या आणि मुक्या प्राण्यांच्या जिवाशी खेळणाऱ्या, बोगस डॉक्टरांवर महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यक संघटनेनेही ७ जुलै रोजी महाराष्ट्र राज्य पशुवैद्यक परिषदेकडे आपला आक्षेप नोंदविला आहे.
-- असे फुटले बिंग---
बोगस पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यक संघटना व डॉक्टर धीरज पाटील यांच्या हाती राहुल घाटकर नामक व्यक्तीचे प्रिस्क्रिप्शन लागले. त्यावर कुठलाही रजिस्ट्रेशन नंबर नाही, मात्र डीव्हीएससी एएच अशी शैक्षणिक पात्रता नमूद आहे. राहुल घाटकर हा महाराष्ट्र राज्य पशुवैद्यक परिषद, नागपूरच्या नोंदणी पुस्तकानुसार नोंदणीकृत पशुवैद्यक नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. असे हजारो बोगस डॉक्टर राज्यात व्हेटरनरी मेडिसिनची प्रॅक्टिस करीत आहेत. त्यांच्या उपचारामुळे अनेक मुक्या जनावरांना प्राणास मुकावे लागले आहे.
-- गंभीर स्वरूपाची ऑडिओ क्लिप---
बोगस डॉक्टरांच्या अनुषंगाने व त्यांच्याकडे असलेल्या शैक्षणिक पात्रतेविषयी गंभीर स्वरूपाची ऑडिओ क्लिप व्हॉट्सॲपवर व्हायरल झाली आहे. केवळ दहा हजार रुपये द्या आणि पशुवैद्यक शास्त्राच्या अनुषंगाने कुठलेही प्रमाणपत्र मिळवा. या प्रमाणपत्रकरिता कॉलेजमध्ये जायची आवश्यकता नाही, असा त्यात उल्लेख आहे. सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या या ध्वनिमुद्रिकेसह त्या प्रिस्क्रिप्शनचा उल्लेख बी.आर. रामटेके यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षक व जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांना पाठवलेल्या ९ जुलैच्या पत्रात केला आहे.